आमदारांनी घेतला चामोर्शी तालुक्याच्या विकासाचा आढावा
By Admin | Updated: January 7, 2015 22:52 IST2015-01-07T22:52:50+5:302015-01-07T22:52:50+5:30
स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात आ. डॉ. देवराव होळी यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विकास कामांचा आढावा घेतला.

आमदारांनी घेतला चामोर्शी तालुक्याच्या विकासाचा आढावा
चामोर्शी : स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात आ. डॉ. देवराव होळी यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विकास कामांचा आढावा घेतला.
यावेळी पंचायत समिती सभापती शशिकला चिळंगे, उपसभापती केशव भांडेकर, जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के, धर्मप्रकाश कुकुडकर, कक्ष अधिकारी कागदेलवार, खुशाल वाढई, पांडुरंग वाढई, परशुराम पेरगुरवार, तुषार सातपुते, योगा टिकले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदारांनी प्रत्येक गावामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रगतीविषयीची माहिती जाणून घेतली. ज्या गावांमध्ये विकास कामांना अजूनही सुरूवात झाली नाही, अशा गावांमध्ये तत्काळ विकास कामे सुरू करावी, असे निर्देश दिले. त्याचबरोबर महात्मा गांधी यांचे ग्राम स्वराज्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, आर्थिक विषमता दूर करण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी राज्यशासनाने प्रयत्न सुरू केला असून त्याला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले पाहिजे.
चामोर्शी तालुक्यातील आदर्श गाव जामगिरी येथील कुऱ्हाडबंदी, गुरेचराईबंदी, बोअरवेल बंदी, श्रमदान, नशाबंदी, नसबंदी, लोटाबंदी, सामाजिक एकोपा, स्वच्छता व प्रशासकीय समन्वय आदी बाबतची माहिती जाणून घेतली. या गावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन इतर गावांनीही वाटचाल करावी, असे आवाहन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश अधिकारी, संचालन शेषराव कोहळे तर आभार सरपंच भैय्याजी वाढई यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)