आमदार शिवीगाळ प्रकरणाचे गडचिरोली जिल्ह्यातही पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:38 IST2021-05-12T04:38:30+5:302021-05-12T04:38:30+5:30
गडचिरोली : कोरोनाच्या महामारीला नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि बाधितांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर मंडळी दिवसरात्र एक करत आहेत. अशात वर्धा जिल्ह्यातील ...

आमदार शिवीगाळ प्रकरणाचे गडचिरोली जिल्ह्यातही पडसाद
गडचिरोली : कोरोनाच्या महामारीला नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि बाधितांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर मंडळी दिवसरात्र एक करत आहेत. अशात वर्धा जिल्ह्यातील आमदार रणजित कांबळे यांनी तेथील जिल्हा आरोग्य अधिकारी आणि देवळी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना मोबाइलवरून शिवीगाळ, मारण्याची धमकी आणि अपमानास्पद भाषा वापरली याबद्दल त्यांचा गडचिरोली जिल्हा राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने निषेध करत काळ्या फिती लावून काम केले. आ. कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा काम बंद करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
कोरोनाकाळात कठीण परिस्थितीत सेवा देत असल्याने आरोग्य अधिकारी-कर्मचारी आधीच तणावात असतात. अशा स्थितीत एका लोकप्रतिनिधीने असभ्य भाषेत डॉक्टरांचा अपमान केल्यामुळे वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो) मनस्ताप व्यक्त करत आ. कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. प्रतीकात्मक निषेध म्हणून जिल्हाभर डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम केले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुनील मडावी, कार्याध्यक्ष डॉ. सचिन हेमके, सचिव डॉ. समीर बनसोडे, डॉ. विनोद म्हशाखेत्री व इतर पदाधिकारी उपस्थित होते. तालुकास्तरावरही अशा पद्धतीने निषेध करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
मुलचेरा येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष अशोक बोरकुटे यांच्या वतीने तहसीलदार तलांडे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.