लाखोंचे गाळे धूळखात पडून
By Admin | Updated: November 2, 2016 01:18 IST2016-11-02T01:18:44+5:302016-11-02T01:18:44+5:30
मानव विकास मिशनच्या निधीतून गडचिरोली शहरातील पोटेगाव मार्गावर गोंडवाना कला दालनाची इमारत बांधण्यात आली.

लाखोंचे गाळे धूळखात पडून
दिवसभर चालतो डुकरांचा हैदोस : चुकीच्या पद्धतीने बांधकामाचा परिणाम
गडचिरोली : मानव विकास मिशनच्या निधीतून गडचिरोली शहरातील पोटेगाव मार्गावर गोंडवाना कला दालनाची इमारत बांधण्यात आली. त्याचबरोबर या इमारतीच्या बाजुला १५ ते १६ दुकानगाळे बांधण्यात आले. मात्र चुकीच्या पद्धतीने दुकानगाळे बांधण्यात आल्याने मागील सहा वर्षांपासून हे सर्वच दुकानगाळे रिकामे आहेत. यावर झालेला लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
गडचिरोली जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक कमी असल्याने गडचिरोली जिल्ह्याला मानव विकास निधी अंतर्गत पैसा प्राप्त होतो. याच पैशातून तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांच्या कार्यकाळात गोंडवाना कलादालनाची इमारत बांधण्यात आली. याच इमारतीच्या बाजुला दुकानगाळेही काढण्यात आले. बेरोजगार युवक, बचत गटाच्या सदस्या यांना दुकानगाळे अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश यामागे होता. मात्र गाळ्यांचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने करण्यात आले. गाळ्यांच्या समोरच संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षक भिंत ओलांडून मुख्य दरवाजातून दुकानगाळ्यांमध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी येणे अशक्यच आहे. याचा अंदाज दुकानदारांना आल्याने दुकानदारांनी एकही गाळा खरेदी केला नाही. याच गाळ्यांच्या समोर रस्त्याच्या बाजुला अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. या दुकानांना ग्राहकसुद्धा मिळत आहेत. या परिसरात मुख्य मार्केट नसल्याने ग्राहकांची संख्याही कमी आहे. परिणामी पाहिजे त्याप्रमाणात ग्राहक येत नसल्याचा अनुभव असल्याने दुकानगाळे खरेदी करण्यास तयार होत नाही. या परिसरात दिवसभर डुकरांचाच हैदोस असल्याचे दिसून येते.
कलादालनाची दूरवस्था
दुकानगाळ्यांच्या बाजूला गोंडवन कलादालनाची इमारत आहे. या इमारतीमध्ये आदिवासींच्या संस्कृतीशी संबंधित अनेक साहित्य ठेवण्यात आले आहेत. मात्र या इमारतीच्या व साहित्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. पाच ते सहा वर्षांचा कालावधी उलटूनही अजुनपर्यंत या इमारतीला रंगरंगोटीसुद्धा करण्यात आली नाही.