देसाईगंजमधील दुधाचा महापूर ओसरला
By Admin | Updated: January 10, 2015 22:53 IST2015-01-10T22:53:50+5:302015-01-10T22:53:50+5:30
दुधाळ गायी आणि विदेशातून आणलेल्या जर्सी गायींच्या वळूंची पैदास करून दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी देसाईगंज येथे उभारण्यात आलेल्या पशुधन पैदास प्रक्षेत्राची दूरवस्था झाली आहे.

देसाईगंजमधील दुधाचा महापूर ओसरला
महेंद्र चचाणे - देसाईगंज
दुधाळ गायी आणि विदेशातून आणलेल्या जर्सी गायींच्या वळूंची पैदास करून दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी देसाईगंज येथे उभारण्यात आलेल्या पशुधन पैदास प्रक्षेत्राची दूरवस्था झाली आहे. या केंद्रातून शासनाला शून्य उत्पन्न मिळत असताना मात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दर महिन्याला १५ लाखाचा खर्च केला जात आहे.
देसाईगंज येथे १९७८ मध्ये पशुधन पैदास प्रक्षेत्राची निर्मिती करण्यात आली. मात्र शासकीय स्तरावरची उदासिनता व येथे कार्यरत तत्कालीन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष या दोन गोष्टींमुळे पशुपैदास प्रक्षेत्र पूर्णपणे मोडीत निघाले आहे.
१४०० हेक्टर जागेवर पसरलेल्या प्रक्षेत्राला आता जंगलाचे स्वरूप आले आहे. प्रारंभी या कार्यालयात बदली झाली म्हणून नोकरी करण्याच्या मानसिकतेतून आलेल्या अधिकाऱ्यांनी या पशुपैदास क्षेत्राचे बारा वाजविले. या केंद्राची देखभाल व प्रशासकीय व्यवस्थापन हे पशुसंवर्धन विभागाकडे सोपविण्यात आले. त्यांच्याकडून मागणी करूनही साहित्याचा पुरवठा होत नव्हता.
त्यानंतर दादासाहेब देवतळे मंत्री झाल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारकडून प्रक्षेत्रासाठी १५ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यातून देसाईगंजपासून ३ किमी अंतरावर वळूमाता प्रक्षेत्र व दुग्ध उत्पादन केंद्राची निर्मिती करण्यात आली. त्याकरिता पशुसंर्धन विभागाला सभोवतालच्या जंगलाची १४०० हेक्टर जागा हस्तांतरित करण्यात आली.
सन १९७८ मध्ये या केंद्राला मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात १९८२ पासून विसोरा ग्रामपंचायतीच्या हद्दीत वळूमाता संगोपण व पैदास प्रक्षेत्र सुरू झाले. यावेळी तेथे ९८ आॅस्ट्रेलियन गायी व दोन सांड येथे आणण्यात आले. तेव्हा एका दिवसाला ५०० ते दीड हजार लिटरपर्यंत दुधाचे उत्पादन घेतले जात होते.
दुग्ध व्यवसायात वडसा हे गाव विदर्भात गणल्या जात होते. मात्र या प्रक्षेत्रात पूर्वी ज्या वसाहतीत कर्मचारी राहत होते, त्या वसाहतीला आता जंगलाचे रूप आले आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी व लिपिक येथे राहतात. अधिकारी मात्र देसाईगंज शहरातून येथे ये-जा करतात.