खासगी वाहनांवर महाराष्ट्र शासनाचा उल्लेख
By Admin | Updated: May 10, 2014 00:42 IST2014-05-10T00:13:54+5:302014-05-10T00:42:51+5:30
गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात अनेक खासगी वाहने महाराष्ट्र शासनाच्या नावाचा उल्लेख वाहनावर करून राजरोसपणे फिरत आहेत

खासगी वाहनांवर महाराष्ट्र शासनाचा उल्लेख
गडचिरोली : गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात अनेक खासगी वाहने महाराष्ट्र शासनाच्या नावाचा उल्लेख वाहनावर करून राजरोसपणे फिरत आहेत. काही वाहनचालकांनी तर अशा पाट्याच तयार करून घेतल्या आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्हा प्रशासनासह परिवहन विभागाचेही दुर्लक्ष आहे. गडचिरोली हा राज्यातील अतिमागास जिल्हा आहे. नक्षलग्रस्त भाग असलेल्या या जिल्ह्याच्या १२ तालुक्यांमध्ये राज्य शासनाच्या ६५ आस्थापना काम करतात. या ठिकाणी काही शासकीय कार्यालयांना शासनाकडून वाहन देण्यात आले आहे. काही कार्यालयात वाहन देण्यात आलेले नाही. जिल्हा परिषदसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेत सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांमध्ये भाडे तत्वावर खासगी वाहने लावले जातात. वनविभागाकडेही बरीचशी वाहने स्वत:ची असले तरी काही वाहने ही खासगीरित्या भाड्याने घेतलेली आहेत. जिल्ह्यात शासनाची वाहने ही महाराष्ट्र शासनाचा नामोल्लेख करून फिरतात. परंतु जवळ-जवळ तेवढ्याच संख्येत खासगी वाहनेही महाराष्ट्र शासनाच्या नावाचा ठळकपणे उल्लेख करून रस्त्यावर धावत आहे. काही चारचाकी वाहनांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या नावाची पाटीही ठेवण्यात येत आहे. ही वाहने कोणत्या विभागाकडे भाडे तत्वावर आहे. याचीही माहिती नाही. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोलीकडे या संदर्भात विचारणा केली असता जिल्ह्यात वाहनांची कमतरता असल्यामुळे शासनाच्या अनेक विभागात भाडे तत्वावर वाहने घेतली जातात. या वाहनांचा नंबर जर आपण दिला, तर आम्ही ते वाहन शासकीय कामासाठी भाड्याने घेतले आहे काय याची शहानिशा करू शकतो, अशी माहिती अधिकार्यांनी दिली. अशा पाट्या लावून वाहन चालविणे गुन्हा असला तरी गडचिरोली जिल्ह्यात मात्र सर्रासपणे वाहनांवर महाराष्ट्र शासनाच्या पाट्या लावल्या जात आहे व हे वाहन खासगी प्रवाशी वाहतूकीसाठीही वापरली जात आहे. यावर वाहतूक पोलीस विभागाचेही नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येत आहे. काही वाहन ही शासकीय कार्यालयातून भाडे तत्वावरून बंद केलेली असली तरी त्या वाहनांवरील महाराष्ट्र शासनाची पाटी मात्र कायमच आहेत. अनेक खासगी ट्रक शासकीय कामांसाठी भाड्याने घेतले जातात. या ट्रकवर शासकीय सेवेत असल्याचा उल्लेखही केला जातो. एकुणच या गंभीर प्रकाराकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे. काही महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांना शस्त्रसाठा पुरवठा करताना एका शासकीय रूग्णवाहिकेला पकडण्यात आले होते. अशा वाहनातूनही असामाजिक तत्वांसाठी काम होऊ शकते, अशी शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)