बैलाच्या प्रेमापोटी शेतकऱ्याने बांधले स्मारक

By Admin | Updated: September 13, 2015 01:20 IST2015-09-13T01:20:11+5:302015-09-13T01:20:11+5:30

मानवाचे कर्तृत्व अगाध असले की, त्या कर्तृत्ववान व्यक्तीचे कार्य व विचार वर्तमान तथा भविष्यातील पिढींनाही कायम स्मरणात राहावे ...

Memorial built by farmer's love | बैलाच्या प्रेमापोटी शेतकऱ्याने बांधले स्मारक

बैलाच्या प्रेमापोटी शेतकऱ्याने बांधले स्मारक

काळा बैल म्हणून होता प्रसिध्द : कसारीच्या लक्ष्मण गोपी झोडे यांची कृतज्ञता
अतुल बुराडे विसोरा
मानवाचे कर्तृत्व अगाध असले की, त्या कर्तृत्ववान व्यक्तीचे कार्य व विचार वर्तमान तथा भविष्यातील पिढींनाही कायम स्मरणात राहावे आणि प्रेरणादायक ठरावे म्हणून समाधी, पुतळे, स्मारक उभारले जातात. मात्र एखाद्या मुक्या जनावराचे स्मारक उभारले असे क्वचितच ऐकायला मिळते. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यामध्ये येणाऱ्या यशवंत ग्राम कसारी येथे लक्ष्मण गोपी झोडे या शेतकऱ्याने आपल्या जिवापाड प्रिय बैलावरील असलेल्या प्रेमाखातर त्याचे स्मारक बांधले आहे. एकीकडे माणसामाणसांत प्रेम, आपुलकी व जिव्हाळा संपतोय अशी अशी भिती व्यक्त होत असताना येथे जनावराप्रती व्यक्त होणारे प्रेम पहावयास मिळते.
कसारी येथील मुळ रहिवासी लक्ष्मण गोपी झोडे यांनी काळ्या रंगाचा वासरु घरी पोसला होता. कालांतराने त्यावर त्यांचा इतका जीव जडला की, त्यांनी त्या वासराचे पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेत पालनपोषण केले. वासरु धावू लागला तेव्हा त्यांना त्याच्यात एक वेगळीच चपळता दिसली त्याच्यातला हाच गुण हेरुन झोडे यांनी त्याला शंकरपटाच्या शर्यतीत सहभागी करुन घेतले. पंचक्रोशीत हा बैल काळा बैल म्हणून सूप्रसिध्द होता. आपल्या ३० वर्षांच्या जीवनात तब्बल १० वर्ष परिसरातील शंकरपटाच्या इतिहासात त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आणि पाहता पाहता काळ्या बैलाने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पंचक्रोशीत नावलौकिक मिळविला.
या बैलाची महती सांगताना लक्ष्मण झोडे म्हणाले की, या काळ्या बैलाने आपल्या जीवनप्रवासात एकही शर्यत हरली नाही. घोड्यालासुध्दा या बैलाने धावण्याच्या शर्यतीत हरवले. विशेष बाब म्हणजे एका दिवसात दोन ते तीन वेळा बैलजोड्यांशी पटावर धावूनही बैल प्रत्येक वेळा सारख्याच दमाने धावायचा. मालकाने बैलाची केलेल्या संगोपनाची व संस्काराची उतराई त्याने स्वत:च्या कार्यकर्तृत्वातून केली. मात्र जन्म झाला की मृत्यू निश्चित असतो आणि सन १९८२ च्या सुमारास काळ्या बैलानेसुध्दा या जगाचा निरोप घेतला परंतू मालकानेही त्याच्या व्यक्तिमत्त्वाला सलाम करण्यासाठी नव्हे बैलाप्रती कृतज्ञ राहण्यासाठी तसेच त्याची आठवण कायम स्मरणात राहावी म्हणून त्यांनी काळ्या बैलाचे स्मारक कसारीच्या गावतलावाजवळ बांधले. हे स्मारक आपल्याला नेहमीच प्रेरणा देते अशा भावना नव्वद वर्षीय झोडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

Web Title: Memorial built by farmer's love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.