मयालघाट गाव दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:35 IST2021-03-16T04:35:52+5:302021-03-16T04:35:52+5:30
काेरची : तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या मयालघाट गावात अजूनही भाैतिक साेयीसुविधा पाेहाेचल्या नाहीत. गाेदिंया-गडचिराेली जिल्ह्याच्या सीमेवर हे ...

मयालघाट गाव दुर्लक्षित
काेरची : तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या मयालघाट गावात अजूनही भाैतिक साेयीसुविधा पाेहाेचल्या नाहीत. गाेदिंया-गडचिराेली जिल्ह्याच्या सीमेवर हे गाव वसले आहे. या ठिकाणी चवथीपर्यंत शाळा आहे. हे गाव जंगलाने वेढले आहे.
कुटीर उद्याेग पूर्वपदावर
गडचिराेली : जिल्ह्यात शेतीवर आधारित अनेक कुटीर उद्याेग आहेत. लाॅकडाऊनच्या कालावधीत हे सर्व उद्याेग बंद पडले हाेते. अनलाॅकची प्रक्रिया राबविल्यानंतर आता हे उद्याेग पुन्हा सुरू झाले आहेत. या उद्याेगांची उलाढाल वाढली आहे. त्यामुळे राेजगारनिर्मिती हाेत आहे.
बॉयोमेट्रिक मशीन बंद, कर्मचारी बिनधास्त
आलापल्ली : अहेरी तालुका मुख्यालयातील शासकीय कार्यालयात कर्मचारी, अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहावेत, याकरिता अनेक कार्यालयांमध्ये बॉयोमेट्रिक मशीन बसविाण्यात आलेल्या आहेत. मात्र मशीन बंद असल्याने कर्मचारी बिनधास्त झाले आहेत.
ट्रॅक्टरचालकांसाठी परवाना शिबिराची गरज
एटापल्ली : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूकविषयाचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले तरुण ट्रॅक्टर चालवितात. गेल्या पाच वर्षांत ट्रॅक्टर अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरधारकांसाठी शिबिराची गरज आहे.
आलापल्लीतील थ्री-जी सेवा कुचकामी
आलापल्ली : येथे बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा बसविण्यात आली आहे. मात्र ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलची इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे आहे.
वाहतुकीची काेंडी
गडचिराेली : चामाेर्शी राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही. त्यामुळे शहरातून एकतर्फी वाहतूक करण्यात आली आहे. दाेन माेठमाेठी वाहने समाेरासमाेर आल्यानंतर वाहतुकीची काेंडी हाेते. दुसऱ्या बाजूचे काम सुरू करण्याची मागणी हाेत आहे.
खासगी स्पर्धक गरजेचे
धानाेरा : तालुक्यात खासगी कंपन्यांचे माेबाइल टाॅवर नाहीच्या बराेबर आहेत. त्यामुळे बीएसएनएलची एकाधिकारशाही आहे. ९० टक्के ग्राहक बीएसएनएलचे आहेत. मात्र बीएसएनएलने सेवेत सुधारणा केली नसल्याने ग्राहक कमालीचे त्रस्त आहेत. काही ठिकाणी टाॅवर आहेत. मात्र ते काम करीत नाही.
९० टक्के पथदिवे बंद
गडचिराेली : आरमाेरी मार्गावर कठाणी नदीपर्यंत पथदिवे लावण्यात आले आहेत. मात्र यातील ९० टक्के पथदिवे बंद आहेत. या मार्गावर रात्री व पहाटेला शेकडाे नागरिक फिरण्यासाठी जातात. त्यामुळे नगर परिषदेने या मार्गावरील पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
मिरकलात वीज नाही
अहेरी : तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या मिरकल गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. प्रधानमंत्री ग्रामसडक याेजनेंतर्गतसुद्धा या गावाला रस्ता बांधून६ देण्यात आला नाही. त्यामुळे जंगलातून जाणाऱ्या पायवाटेने हे गाव गाठावे लागते. विजेचे खांब लावले, मात्र वीज पाेहाेचली नाही.
कचऱ्याचे व्यवस्थापन करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी होत आहे.
खाऊचा दर्जा खालावला
अहेरी : अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून या शालेय पोषण आहाराचा दर्जा घसरत चालला आहे. त्यामुळे विद्यार्थी सदर पोषण आहार खात नाही. परिणामी पोषण आहार फेकून द्यावा लागतो. आहाराच्या दर्जाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी हाेत आहे.
स्वच्छतेचा विसर
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील अनेक कार्यालयांत पसरलेल्या घाणीमुळे शासकीय कार्यालयांतील स्वच्छता पाळण्याच्या प्रयत्नाला हरताळ फासला आहे. अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरली असल्याने या ठिकाणी बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
मातीचे बंधारे बांधा
आलापल्ली : वनविभागातर्फे दोन वर्षांपूर्वी जंगलातील सहा स्थानांवर मातीचे बांध बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर प्रस्ताव अजूनही धूळ खात पडले आहेत. मातीचे बंधारे निर्माण झाल्यास सिंचनाची सोय होईल.
वसाचा निवारा जीर्ण
गडचिरोली : आरमोरी मार्गावर असलेल्या गडचिरोली तालुक्यातील वसा येथील प्रवासी निवाऱ्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या प्रवासी निवाऱ्याचे छत वादळामुळे पूर्णत: उडाले आहे. प्रवासी निवाऱ्याला वनस्पतींनी वेढा घातला असून, भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.