जननी सुरक्षा कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:34 IST2021-05-15T04:34:45+5:302021-05-15T04:34:45+5:30
गडचिरोली : गावात क्षुल्लक कारणावरून तंटे निर्माण होऊ नये, झालेच तर ते गावपातळीवरच मिटवून गावात शांतता, व्यसनमुक्ती व्हावी, ...

जननी सुरक्षा कुचकामी
गडचिरोली : गावात क्षुल्लक कारणावरून तंटे निर्माण होऊ नये, झालेच तर ते गावपातळीवरच मिटवून गावात शांतता, व्यसनमुक्ती व्हावी, यासाठी तंमुसची स्थापना करण्यात आली. तंमुसचा कारभार चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी सदस्यांना प्रशिक्षण द्यावे.
जननी सुरक्षा कुचकामी
आलापल्ली : शासनाच्या वतीने जननी सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही.
पांढरे पट्टेविरहित दिसतात गतिरोधक
आष्टी : वाहनचालकांना रस्त्यावरील गतिरोधक दिसावे, यासाठी गतिरोधकावर पांढरे पट्टे मारले जातात. मात्र बहुतांश गतिरोधकांवर पट्टे दिसत नाही. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. अनेक अवजड वाहनधारक वेगाने जातात.
गोकूळनगरात पोलीस चौकीची मागणी
गडचिरोली : येथील गोकूळनगरात चोरी व गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे येथे पोलीस चौकी निर्माण करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्रीही नगरात वाढली आहे.
झिंगानूर येथे विद्युत उपकेंद्र निर्माण करा
झिंगानूर : येथे विद्युत उपकेंद्र निर्माण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. झिंगानूरपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या बामणी येथून वीजपुरवठा या परिसरात केला जात आहे. दूरवरून वीजपुरवठा होत असताे.
नदीतील पाणी दूषित
आरमोरी : शहरातील अनेक नागरिक नदीपात्रात निर्माल्य तसेच टाकाऊ पदार्थ टाकतात. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढले आहे. यावर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यातून वैैनगंगा नदी वाहते. या नदीच्या किनाऱ्यावर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो पाणीपुरवठा योजना आहेत.
जयरामपुरात कव्हेरज गूल
आष्टी : जयरामपूर परिसरातील भ्रमणध्वनी सेवा मागील अनेक दिवसांपासून विस्कळीत होत असल्याने या भागातील विविध कंपन्यांच्या भ्रमणध्वनी ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनी मनोऱ्यांची रेंज वाढवावी, अशी मागणी परिसरातील ग्राहकांनी केली आहे.
प्रसूतिगृहात सुविधा द्या
आरमोरी : जिल्ह्यातील ३७६ आरोग्य केंद्रांपैकी ३५४ उपकेंद्रांमध्ये प्रसूतिगृह बांधण्यात आले आहेत. मात्र सदर प्रसूतिगृह अत्यंत लहान असून या प्रसूतिगृहांमध्ये आवश्यक असलेल्या सोयीसुविधांचा अभाव असल्याने गरोदर मातांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे प्रसूतिगृहात सुविधा द्याव्या.
अनेक भूखंड रिकामे
गडचिरोली : शहराजवळ शेकडो एकर जागा असून, एमआयडीसीसाठी राखीव करण्यात आली आहे. या परिसरात पाणी, वीज यासारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र बहुतांश भूखंड रिकामेच आहेत. उद्याेग उभारल्यास बेराेजगारांना राेजगार मिळू शकताे. यासाठी पुढाकार आवश्यक आहे.
रानवाही मार्ग खड्ड्यात
धानोरा : तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या चव्हेला ग्रामपंचायतमधील रानवाही या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. चव्हेला-रानवाही या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने या भागातील वाहनधारक व प्रवाशांची प्रचंड पंचाईत होत आहे. त्यामुळे मार्गाची दुरुस्ती करावी.
बाेगस देयके वाढली
गडचिरोली : जिल्हाभरातील काही दुकानदार नकली बिल देऊन ग्राहक व शासनाची फसवणूक करीत आहेत. नकली बिल देणाऱ्या दुकानदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने अनेक दुकानदार बाेगस बिल ग्राहकांना देत आहेत.
निराधारांचे अनुदान वाढवा
कुरखेडा : निराधारांना शासनाकडून प्रतिमहा अत्यल्प अनुदान दिले जाते. सदर अनुदान अत्यंत कमी आहे. महागाईमुळे प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा करण्यात येऊनही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई वाढत असल्याने अनुदान तुटपुंजे ठरत आहे.
सेविकांची पदे रिक्त
गडचिरोली : जिल्ह्यात ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३६ आरोग्य पथक व ३७६ उपकेंद्रे आहेत. या सर्व ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आरोग्य सेवा देण्याचे काम परिचारिका करते, मात्र जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत परिचारिकांचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात दरहजारी परिचारिकांचे प्रमाण ५.३१ टक्के आहे.
निवाऱ्यांची दुरवस्था
गडचिरोली : येथून आरमोरीकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या मोहझरी, वसा, देऊळगाव येथील प्रवासी निवाऱ्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करताना त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी निश्चित करावी.
पुलाची उंची वाढवा
धानोरा : तालुक्यातील कारवाफा नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा सदर मार्ग बंद राहत असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
स्वच्छतागृहाचा अभाव
धानोरा : चातगाव येथील बसथांब्यावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने त्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चातगाव बसस्थांब्यावर स्वच्छतागृहाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे. चातगाव हे धानाेरा मार्गावर असून, येथे शेकडाे नागरिक दरराेज आवागमन करीत असतात.