लग्नसोहळा स्थगित करून दिला कोरोनापासून बचावाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 06:00 AM2020-03-26T06:00:00+5:302020-03-26T06:00:52+5:30

सामाजिक दायित्वातून कोरोनाबद्दलची जनजागृती करणारे संदेश पाठवून वर-वधू पक्षाच्या मंडळींनी संवेदनशिलतेचा परिचय दिला. ‘गरीबाच्या लग्नाला सतराशेसाठ विघ्न’ अशी एक म्हण प्रचलित आहे. परंतु यावर्षी कोरोनाच्या विघ्नाने गरिब किंवा श्रीमंत असा भेद न करताच सर्वांनाच लपेटले आहे. त्यामुळे अनेकांचे मार्च, एप्रिलमध्ये होणारे लग्न पुढे ढकलण्याची पाळी आली.

Marriage postponement Coronation message | लग्नसोहळा स्थगित करून दिला कोरोनापासून बचावाचा संदेश

लग्नसोहळा स्थगित करून दिला कोरोनापासून बचावाचा संदेश

Next
ठळक मुद्देकोरोना रोखण्यासाठी पुढाकार : राऊत आणि मिसार परिवाराचा निर्णय

अतुल बुराडे/विष्णू दुनेदार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा/तुळशी : विवाह म्हणजे जीवनातील अतीव प्रतीक्षेचा आणि आनंदादायी असा कौटुंबिक, सामाजिक उत्सव. प्रत्येक जण विवाहसंस्कार आपापल्या पध्दतीने जेवढा अविस्मरणीय करता येईल तेवढा प्रयत्न करीत असतो. यासाठी वर्षभरापासून जय्यत तयारीसुध्दा सुरू झालेली असते. आनंदाला उधान आलेले असते. पण यावर्षी कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने सर्वच सोहळ्यांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. मात्र सोहळ्याचा आनंद घेता आला नाही तरी पाहुण्यांना केवळ सोहळा रद्द झाल्याचा निरोप न देता सामाजिक दायित्वातून कोरोनाबद्दलची जनजागृती करणारे संदेश पाठवून वर-वधू पक्षाच्या मंडळींनी संवेदनशिलतेचा परिचय दिला.
‘गरीबाच्या लग्नाला सतराशेसाठ विघ्न’ अशी एक म्हण प्रचलित आहे. परंतु यावर्षी कोरोनाच्या विघ्नाने गरिब किंवा श्रीमंत असा भेद न करताच सर्वांनाच लपेटले आहे. त्यामुळे अनेकांचे मार्च, एप्रिलमध्ये होणारे लग्न पुढे ढकलण्याची पाळी आली. त्याअनुषंगाने प्रथम देशहिताला सहकार्य करण्याच्या भावनेतून देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील उपवर आकाश मारोती राऊत आणि वधुपक्ष मिसार यांच्याकडील मंडळींनी दि.२७ मार्चला नियोजित असलेले लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निमंत्रित पाहुणेमंडळींना सोशल मिडियाच्या माध्यमातून संदेश पाठवून आप-आपल्या घरी राहात सरकार व प्रशासनाला कोरोनाशी लढण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कुरूड येथील स्व.मारोती राऊत यांचे चिरंजीव आकाश व स्व.हरिश्चंद्र मिसार यांची मुलगी तेजस्वीनी (रा.कन्हाळगाव ता.लाखांदूर, जि. भंडारा) यांचा विवाह सोहळा दि.२७ ला कुरूड येथे संपन्न होणार होता. परंतु संपूर्ण समाजावर आलेली कोरोनाची आपत्ती लक्षात घेऊन लग्न समारंभ पुढे ढकलण्यात आला. उपवर आकाश यांनी निमंत्रितांना याची माहिती देताना कोरोना आजाराबाबत कशी काळजी घ्यावी याचे मार्गदर्शनही केले.
 

Web Title: Marriage postponement Coronation message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.