गडचिरोलीत पोलिसांनी लावले २०२ आदिवासी जोडप्यांचे विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 13:26 IST2017-10-16T13:23:08+5:302017-10-16T13:26:20+5:30
पोलिस हा जनतेचा सेवक असतो, मित्र असतो, मार्गदर्शक व संरक्षक असतो हे आजवरच्या अनेक उदाहरणांतून अनुभवले असेल. मात्र पोलिस हा सामुदायिक लग्ने लावण्यात पुढाकार घेणारा व ते विनाअडथळा पूर्ण करणारा वडिलधारा व्यक्ती जेव्हा होतो तेव्हा ती एक विशेष बाब ठरते.

गडचिरोलीत पोलिसांनी लावले २०२ आदिवासी जोडप्यांचे विवाह
आॅनलाईन लोकमत
अहेरी-
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेल्या दामरंचा या गावात हे अभिनव आयोजन रविवारी करण्यात आले. विशेष म्हणजे, नक्षलवाद्यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया कमलापूर या गावापासून दामरंचा हे गाव अवघ्या वीस कि.मी. अंतरावर आहे.
पोलिस विभागातर्फे घेण्यात येणाºया जनजागरण मेळाव्यात या वेळी काहीतरी वेगळे करायचे असा निश्चय पोलिस विभागाचा झाला आणि त्यांनी त्यासाठी तयारी सुरू केली. दामरंचाचे पोलीस अधीक्षिक अभिनव देशमुख यांच्या पुढाकाराने अप्पर पोलीस अधीक्षक राजा यांच्या नियंत्रणाखाली व उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या अध्यक्षतेत हा जनजागरण व आदिवासी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला.
या अभूतपूर्व विवाह सोहळ््यात दामरंचाच्या हद्दीत येणाºया २६ गावांमधील गावकरी सहभागी झाले होते. यावेळी २०२ जोडपी विवाहबद्ध झाली. नवपरिणीत दांपत्यांना नवे कपडे व काही आवश्यक वस्तूंची भेटही देण्यात आली. विवाह सोहळा पार पडताच या जोडप्यांची वरात पोलिस स्टेशनमधून वाजतगाजत निघून गावात फिरून पुन्हा पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आली. या सोहळ््यात जवळपासच्या गावातील सुमारे ३००० नागरिक सहभागी झाले व त्यांनी वधूवरांना आशीर्वाद दिले. उपस्थितांनी आदिवासी नृत्य करून आपला आनंदही साजरा केला. या विवाहाचा समारोप पारंपारिक पद्धतीने आदिवासी भोजनाची मेजवानी देऊन करण्यात आला.
हा सोहळा पार पाडण्यात प्रभारी अधिकारी अनिल लवटे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित भोसले, गणेश मोरे, अप्पासाहेब पडळकर, व्यंकट गंगलवाड आणि अनेक संस्थांनी मदत केली.