चामोर्शीत प्रशासनाकडून बाजारपेठ बंदचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:37 IST2021-04-08T04:37:15+5:302021-04-08T04:37:15+5:30
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या धर्तीवर नव्याने ३० एप्रिलपर्यंतचे आदेश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी ...

चामोर्शीत प्रशासनाकडून बाजारपेठ बंदचे निर्देश
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या धर्तीवर नव्याने ३० एप्रिलपर्यंतचे आदेश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी निर्गमित केले. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद राहतील. असे निर्देश असतानाही बाजारपेठ सुरू असल्याने बुधवारी तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, नायब तहसीलदार दिलीप दुधबळे, पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ, नगरपंचायत प्रशासनाकडून हाफिज सय्यद, संतोष भांडेकर, तलाठी नरेंद्र मेश्राम होमगार्ड, पोलीस कर्मचारी आदींनी शहरात फिरून दुकाने बंद करण्याचे निर्देश दिले असता दुकान व्यावसायिकांनी दुकाने बंद करून प्रशासनाला उत्तम प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसून आले.
यापूर्वी सुद्धा प्रशासनाच्या निर्देशानुसार दुकाने बंद केली होती, त्याचा फटका व्यवसायाला बसला. गतवर्षी याच कालावधीत लॉकडाऊन होते, त्यामुळे व्यावसायिक जवळपास सात-आठ महिने आर्थिक संकटात होते. त्यानंतर हळूहळू व्यावसायिक चार पैसे कमावीत होते. मात्र, ऐन व्यवसाय चालण्याच्या कालावधीत शासनाच्या निर्देशानुसार बाजरपेठ बंद केल्याने व्यावसायिक व त्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची आर्थिक घडी विसकटण्याची शक्यता आहे. दुकाने पुन्हा बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर काही व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.