पोलिसाचे अपहरण करून खून करणाऱ्या माओवाद्यांच्या हस्तकास अटक 

By संजय तिपाले | Published: March 22, 2024 10:51 AM2024-03-22T10:51:33+5:302024-03-22T10:52:50+5:30

भामरागड येथे नाकाबंदी दरम्यान कारवाई : दीड लाखांचे होते बक्षीस 

maoists who kidnapped and killed a policeman were arrested | पोलिसाचे अपहरण करून खून करणाऱ्या माओवाद्यांच्या हस्तकास अटक 

पोलिसाचे अपहरण करून खून करणाऱ्या माओवाद्यांच्या हस्तकास अटक 

संजय तिपाले, गडचिरोली : पोलिस अंमलदाराचे अपहरण करून खून, जाळपोळ, दमदाटी करत माओवाद्यांचा हस्तक म्हणून काम करणाऱ्या मोस्ट वाँटेड आरोपीला पोलिसांनी भामरागड येथे २१ मार्च रोजी जेरबंद केले. पेका मादी पुंगाटी (वय ४९, रा. मिरगुळवंचा, ता. भामरागड) असे त्याचे नाव आहे. त्याच्याअटकेसाठी महाराष्ट्र सरकारने दीड लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

फेब्रुवारी ते मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात.  या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे अशी कृत्ये करत असतात.  टीसीओसी कालावधी  तसेच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस दलाने २१ मार्च रोजी भामरागड परिसरात नाकाबंदी सूरू केली होती. क्युआरटी, सीआरपीएफचे जवान व भामरागड पोलिस कर्तव्य बजावत असताना नाकाबंदीच्या ठिकाणी एक व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरत असल्याचे निदर्शनास आले.

त्यास ताब्यात घेऊन अधिक सखोल चौकशी केली असता तो मोस्ट वाँटेड माओवादी हस्तक पेका पुंगाटी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यास अटक केली. १९ डिसेंबर २०२३ रोजी माओवाद्यांनी हिद्दुर गावामध्ये असलेल्या गोटुलजवळ लावलेले ३ ट्रॅक्टर, एक जेसीबी पेटवून  मजुरांना मारहाण व दमदाटी केली होती. या गुन्ह्यात तो सामील होता. सन २०१६ मध्ये एका पोलिस अंमलदाराचे अपहरण करुन खून केल्याच्या अनुषंगाने भामरागड येथे दाखल गुन्ह्यात देखील त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक (अभियान) यतीश  देशमुख, अहेरीचे अपर अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अमर मोहिते व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

माओवाद्यांना पुरवायचा रेशनचे धान्य 

पेका पुंगाटी हा माओवाद्यांकरता काम करायचा. माओवाद्यांना रेशनचे धान्य पुरविणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

Web Title: maoists who kidnapped and killed a policeman were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.