बसवा राजूच्या एन्काउंटरनंतर माओवादी बिथरले, भारत बंदची हाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:02 IST2025-06-02T13:02:13+5:302025-06-02T13:02:37+5:30
पत्रकातून आगपाखड : देशभर स्मारक सभा घेण्याची घोषणा

Maoists scattered after Basava Raju's encounter, call for Bharat Bandh
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) सरचिटणीस व माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव ऊर्फ बसवा राजू (७०) हा २१ मे रोजी छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ठार झाला. या चकमकीत एकूण २७ माओवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले. यानंतर माओवादी सैरभैर झाले आहेत.
माओवाद्यांचा केंद्रीय समिती सदस्य भूपती ऊर्फ अभय याचे २८ मे रोजी जारी झालेले पत्रक समोर आले असून, त्यात त्याने बसवा राजूच्या एन्काऊंटरबद्दल आगपाखड केली आहे. १० जून रोजी भारत बंदची हाक देत त्याने देशभर स्मारक सभादेखील आयोजित करणार असल्याचीही घोषणा केली आहे.
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर २१ मे रोजी माओवादी व जवानांत जोरदार चकमक झाली होती. यात नंबाला केशव राव ऊर्फ बसवा राजूचा मृत्यू झाला होता. चार दशकांनंतर पहिल्यांदाच नक्षलवाद्यांचा मोठा नेता मारला गेल्याने चळवळीला मोठा धक्का बसला आहे. केंद्र सरकारने शांतता आणि युद्धबंदीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करत २७ नक्षलवाद्यांची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. जानेवारी २०२४ पासून केंद्र सरकारने अशाच पद्धतीने ५४० नक्षलवाद्यांना मारल्याचा आरोपदेखील या पत्रकात केला आहे. केंद्र सरकारच्या याच धोरणाचा विरोध करण्यासाठीच १० जूनला देशव्यापी बंदचे आवाहनही नक्षलवाद्यांनी केले आहे. एवढेच प्रवक्ता अभय याने जारी केलेले हेच नाही तर ११ जून ते ३ ऑगस्टदरम्यान ते पत्रक.
बसवा राजू आणि इतर मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मृतीत 'स्मारक सभा' आयोजित करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. नक्षल चळवळीतील बसवा राजूच्या प्रवासाची इत्थंभूत माहितीही पत्रकात दिली आहे.
शोषण आहे तोपर्यंत चळवळ संपणार नाही
१९७२ साली नक्षल चळवळीचा संस्थापक चारू मुजुमदारच्या मृत्यूनंतरही असेच दावे केले जात होते. मात्र, १९७८ दरम्यान आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांत चळवळ पुन्हा उभी राहिली. १९९९ सालीदेखील केंद्र समिती सदस्य श्याम, मुरली आणि महेशला ठार करून प्रशासनाने असाच दावा केला होता. पण ही चळवळ सुरूच राहिली. चारू मुजुमदारनंतर गेल्या ५३ वर्षात अनेक मोठे नेते मारले गेले. तरीही ही चळवळ पुन्हा उभी राहिली. जोपर्यंत देशात शोषण आहे तोपर्यंत ही चळवळ संपणार नाही, असेदेखील पत्रकात शेवटी नमूद केले आहे.