‘भूपती-रुपेश गद्दार!', माओवाद्यांच्या केंद्रीय समितीची आगपाखड; २७० नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर चळवळीत खदखद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 15:28 IST2025-10-20T15:26:20+5:302025-10-20T15:28:32+5:30
चार पानी पत्रकातून ‘अभय’चा इशारा

संग्रहित फोटो
गडचिरोली : गडचिरोली व छत्तीसगडच्या सीमावर्ती जंगलातील तब्बल २७० माओवाद्यांनी एकाच आठवड्यात आत्मसमर्पण केले. चार दशकांपासून लाल दहशतीत वावरणाऱ्या या भागात ही ऐतिहासिक घटना घडल्यानंतर अखेर केंद्रीय समितीने २० ऑक्टोबर रोजी तेलुगुमधून चार पानांचे पत्रक जारी करून आगपाखड केली आहे.या मोठ्या आत्मसमर्पणामागे असलेले दोन प्रमुख चेहरे मल्लोझुला वेणुगोपालराव उर्फ भूपती (सोनू) आणि टक्कलापल्ली वासुदेव राव उर्फ सतीश (रुपेश) यांच्यावर आता नक्षल्यांच्या केंद्रीय समितीनेच तोफ डागली आहे. समितीने या द्वयींना गद्दार संबोधले आहे.
पोलिसांच्या संपर्कात होता भूपती -
या पत्रकात केंद्रीय समितीने केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत. त्यात म्हटले आहे की, जानेवारी महिन्यात भूपतीची पत्नी तारक्का हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केल्यानंतर, भूपतीनेही गुप्तपणे शासनाशी संपर्क ठेवला होता.
त्याने सरकारला संघटनेची माहिती पुरवली आणि चळवळीतील कार्यकर्त्यांना दिशाभूल केली, असा दावा समितीने केला आहे. डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या केंद्रीय समितीच्या बैठकीत भूपतीने संघटनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी समितीने त्याला “व्यक्तिवादी, अहंकारी आणि चुकीच्या राजकीय भूमिकेचा” म्हणून फटकारले होते. पण त्याने ते नाकारून स्वतःचा गट तयार केला आणि संघटनेतील इतर सदस्यांना फितवले, असा आरोप करण्यात आला आहे.
चळवळ विकल्याचा आरोप पत्रकात स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, भूपती आणि सतीश यांनी संघटनेशी, क्रांतीशी आणि जनतेशी विश्वासघात केला आहे. त्यांनी सरकारकडे शस्त्र सोपवून नक्षल चळवळीला मोठा धक्का दिला. त्यांना धडा शिकविला जायलाच हवा! हे पत्रक ‘अभय’ या नावाने प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यात या दोघांवर “चळवळीला विकणारे गद्दार” अशी तीव्र भाषा वापरली आहे.