जहाल माओवादी दाम्पत्यासह महिलेचे आत्मसमर्पण, तिघांवर होते ३८ लाखांचे बक्षीस

By संजय तिपाले | Updated: February 14, 2025 22:12 IST2025-02-14T22:11:26+5:302025-02-14T22:12:10+5:30

मंगलसिंग, वसंतीचा समावेश

Maoist couple along with woman surrender, reward of Rs 38 lakhs was on the three | जहाल माओवादी दाम्पत्यासह महिलेचे आत्मसमर्पण, तिघांवर होते ३८ लाखांचे बक्षीस

जहाल माओवादी दाम्पत्यासह महिलेचे आत्मसमर्पण, तिघांवर होते ३८ लाखांचे बक्षीस

गडचिरोली: दोन दशकांपासून माओवाद्यांच्या  चळवळीत कार्यरत   व सदस्य ते उपकमांडर अशी मजल मारुन अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेला जहाल नेता  विक्रम ऊर्फ मंगलसिंग याने पत्नी वसंती उर्फ सुरेखासह अन्य एक जहाल महिला अशा एकूण तिघांनी १४ फेब्रुवारी रोजी आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर शासनाने ३८ लाखांचे बक्षीस ठेवले होते.

११ फेब्रुवारीला भामरागड तालुक्यातील छत्तीसड सीमेवरील दिरंगी आणि फुलनार जंगलातील चकमकीत महेश नागुलवार या जवानाला वीरगती प्राप्त झाली होती, या पार्श्वभूमीवर या तिघांच्या आत्मसमर्पणनाने नक्षलविरोधी अभियानाला बळ मिळाले आहे.

विक्रम ऊर्फ मंगलसिंग ऊर्फ संदीप सहागु तुलावी (४०) , वसंती ऊर्फ सुरेखा ऊर्फ दुल्लो राजू हिडामी ( ३६, दोघे रा. गुर्रेकसा ता. धानोरा) , नीलाबाई उर्फ अनुसया बंडू उईके (५५,रा. मेडपल्ली ता. भामरागड) अशी त्यांची नावे आहेत. मंगलसिंग हा केंद्रीय समितीसह विभागीय समितीत होता, शिवाय उपकमांडर म्हणून तो कंपनी क्र. १० साठी काम करायचा.  वसंती ही सी- सेक्शन कमांडर म्हणून कंपनी क्र. १० मध्ये कार्यरत होती तर नीलाबाई उर्फ अनुसया ही विभागीय समिती सदस्य कुतुल दलम, माड डिव्हिजनमध्ये होती. आत्मसमर्पणानंतर या तिघांना आता १५ लाखांचे बक्षीस मिळणार आहे. नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल,  उपमहानिरीक्षक (अभियान) अजयकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, १९१ बटालियनचे कमांडन्ट सत्य प्रकाश  यांच्या मार्गदर्शनाखाली हे आत्मसमर्पण झाले.  

गुन्हेकारकीर्द अशी...
विक्रम ऊर्फ मंगलसिंगहा २००४ मध्ये  टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला. २००७ मध्ये माडमधील कुतुल एरीयामध्ये वैद्यकीय कामकाजाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्याने डॉक्टर म्हणून जखमी माओवाद्यांवर उपचार देखील केले.  त्याची पत्नी वसंती ऊर्फ सुरेखा ऊर्फ दुल्लो ही २००८ मध्ये क्रांतीकारी आदिवासी महिला संघटनेतून माओवादी चळवळीत सक्रिय झाली. डॉक्टर टीमसह टेलर टीममध्येही तिने काम केले. नीलाबाई ऊर्फ अनुसयाही १९८८ पासून माओवादी चळवळीत आहे. भामरागड दलममधून तिने प्रवास सुरु केला.  छत्तीसगडच्या कोहलीबेडा दलममध्येही तिने काही वर्षे काम केले. नवीन सदस्यांना माओवादी चळवळीची माहिती देण्याचे व नक्षल साहित्यांच्या भाषांतराचे काम तिने केले.

Web Title: Maoist couple along with woman surrender, reward of Rs 38 lakhs was on the three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.