२०२६ पर्यंत माओवाद समाप्त? वर्षभरात ३५७ माओवादी ठार, बसवराजसह अनेक नेते मृत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 18:14 IST2025-07-17T18:13:47+5:302025-07-17T18:14:51+5:30
२२ पानांच्या पत्रकातून कबुली : चळवळ संपणार नसल्याचा दावा

Maoism to be ended by 2026? 357 Maoists killed in a year, many leaders including Basavaraj dead
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सुरक्षा जवानांनी केंद्रीय मंत्रिमंडळाने आखलेल्या रणनीतीची योग्य अंमलबजावणी केली, गनिमी काव्याचा वापर करून नियोजनबद्ध हल्ले केले, त्यामुळे वर्षभरात माओवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले. देशभरात तब्बल ३५७माओवादी या दरम्यान ठार झाले, अशी कबुली भारतीय कम्युनिस्ट पार्टीने (माओवादी) दिल्याचे १६ जुलै रोजी समोर आले. यासंदर्भात माओवाद्यांचे २२ पानांचे एक पत्रक समोर आले असून त्यात मृत माओवाद्यांच्या स्मरणार्थ सप्ताह घेण्याचे आवाहन केले. शिवाय ३१ मार्च २०२६ पर्यंत चळवळ संपणार नाही, असा दावाही केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून माओवाद नष्ट करू, अशी घोषणा केली आहे. महाराष्ट्रासह छत्तीसगडमध्ये माओवाद्यांविरोधात आक्रमकपणे मोहिमा सुरू आहेत. दरम्यान, जवानांसोबतच्या चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी माओवादी सप्ताह घेत असतात. यावर्षी २८ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान हा सप्ताह होणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. सैन्य दलाने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सूचनेनुसार हल्ले केले. त्यामुळे ३५७ माओवादी ठार झाले. यात १३६ महिलांचा समावेश आहे. सैन्य दलाचे हल्ले उधळून लावण्यासाठी या गनिमी काव्यानुसार युद्धनीती बदलावी लागेल, असेदेखील त्यात नमूद केले आहे.
माओवाद्यांचा सर्वोच्च नेता व भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) सरचिटणीस बसवराज (बीआर) आणि केंद्रीय समितीचे आणखी तीन सदस्य, राज्य समितीचे १५ सदस्य आणि इतरांना गमावले आहे. चार जण पक्षाचे सरचिटणीस, १६ राज्य समिती दर्जाचे, २३ जिल्हा समिती, ८३ एसी/पीपीसी, १३८ पक्ष सदस्य, १७पीएलजीए सदस्य, ३४ जण केंद्रीय समिती सदस्य आहेत. ३६ लोकांची माहिती उपलब्ध नाही, असे पत्रकात म्हटले आहे.
१५-२० दिवसाला हल्ला
- केंद्र आणि राज्य सशस्त्र दलांकडून सरासरी १५-२० दिवसांतून एकदा हल्ला होतो. या हल्ल्यांमध्ये पक्षाचे १०-३५ सहकारी, पीएलजीए, स्थानिक संस्था आणि लोक मारले जात आहेत. सर्व मृत माओवादी १६-१७ ते ९६ वयोगटातील आहेत. सदस्यांपासून ते सर्वोच्च पातळीवरील नेत्यांपर्यंतच्या माओवाद्यांचा यात समावेश आहे.
- मात्र, जवानांनाही जशास तसे उत्तर देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात, वर्षभरात देशात ७५ सुरक्षा जवानांना ठार केले आणि १३० जण जखमी झाले, असा असा दावा पत्रकातून करण्यात आला आहे.
चळवळीतील प्रवासाची माहिती
वर्षभरात चकमकीत ठार झालेल्या प्रमुख माओवादी नेत्यांच्या चळवळीतील प्रवासाची तपशीलवार माहिती देखील पत्रकात दिली आहे. नक्षलबारीनंतर पहिल्यांदाच एका वर्षाच्या कालावधीत ४ सीसीएम आणि १६ एससीएम शहीद झाले. या नुकसानाचा क्रांतिकारी चळवळीवर तुलनेने दीर्घकाळ नकारात्मक परिणाम होईल, असेही पत्रकात नमूद आहे.
"हे पत्रक पाहिले आहे. मात्र, सुरक्षा यंत्रणा आधीपासूनच अलर्ट आहे. माओवाद्यांच्या सप्ताहाला कुठेही थारा मिळणार नाही. सीमावर्ती भागात योग्य त्या सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत."
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक