तलाठी-ग्रामसेवकांच्या अनेक जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:41 IST2021-09-05T04:41:20+5:302021-09-05T04:41:20+5:30
एटापल्ली : अहेरी उपविभागाच्या एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा व अहेरी या पाचही तालुक्यांत महसूल विभागांतर्गत येणाऱ्या तलाठी व ...

तलाठी-ग्रामसेवकांच्या अनेक जागा रिक्त
एटापल्ली : अहेरी उपविभागाच्या एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा व अहेरी या पाचही तालुक्यांत महसूल विभागांतर्गत येणाऱ्या तलाठी व ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी, शेतकरी व नागरिकांची कामे खोळंबत असल्याचे दिसून येत आहे. पदे रिक्त असल्याने नागरिकांची कामे वेळेवर हाेत नाही. अनेक दिवस कर्मचारी येत नसल्याने शेतकऱ्यांना बरेच दिवस प्रतीक्षा करावी लागते.
कुंपणाअभावी पिकांचे जनावरांकडून नुकसान
गडचिरोली : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने तार कुंपणाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या तारांचा पुरवठा करण्याची मागणी आहे. शेत पिकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना काटेरी तार पुरविणे आवश्यक आहे. जनावरांच्या त्रासामुळे अनेकांनी शेती सोडली आहे.
एकेरी वाहतुकीबाबत हालचाली नाही
गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चौकातून आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. सणासुदीच्या कालावधीत व आठवडी बाजाराच्या दिवशी रविवारला या मार्गावर वाहनधारकांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. गडचिराेली शहरात दिवसेंदिवस रहदारी वाढत आहे. त्यादृष्टीने याेग्य उपाययाेजना कराव्या, अशी मागणी हाेत आहे.
ठेंगण्या व अरुंद पुलाचा प्रश्न कायमच
गडचिरोली : ब्रिटिशकाळात बांधलेला एकही पूल गडचिरोली जिल्ह्यात नसला, तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेला चंद्रपूर-आलापल्ली मार्गावरील आष्टीचा पूल ठेंगणा व अरुंद असल्यामुळे या पुलावरून आजवर अनेकांचा वाहन कोसळून बळी गेला आहे. पूल अरुंद असल्याने अपघाताचा धाेका बळावला आहे. त्यामुळे ठेंगण्या व अरुंद पुलाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अंकिसा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील मुख्य मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून आसरअल्लीदरम्यानच्या गावातील नागरिक ये-जा करीत असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे या मार्गाची बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
साखरा बसथांब्यावर गतिरोधक उभारा
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने, साखरा येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधकाअभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत. हा मार्ग वर्दळीचा आहे. याशिवाय चुरचुरा व महादवाडी भागातील नागरिक साखरा येथे येऊन आरमाेरी तसेच अन्य ठिकाणी जातात. या ठिकाणची वर्दळ लक्षात घेता या ठिकाणी गतिराेधक निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
भेंडाळा बसस्थानकावर गतिरोधक उभारा
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बस स्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूल मार्गे, तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. गतिराेधक निर्माण केल्यास वेगाने धावणाऱ्या वाहनावर आळा बसण्यास साेईस्कर हाेणार आहे.
पोटेगाव रस्त्यावर घाणीचे साम्राज्य
गडचिरोली : शहरातील पोटेगाव मार्ग निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो. या मार्गाने अनेक नागरिक फेरफटका मारण्यासाठी पहाटे व सायंकाळी जात असतात, परंतु पोटेगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.