आंब्याची चव महागणार; वातावरणाचा फटका, मोहोर गळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 14:44 IST2025-02-16T14:44:24+5:302025-02-16T14:44:51+5:30
Gadchiroli : लोणची बनविण्यासाठी असणार कैऱ्यांचा तुटवडा

Mango flavor will become expensive; Climate hit, blossoms are dying
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एरव्ही पौष महिन्यात आंब्याला मोहोर लागतो. यंदा केशर, देवगड, दशेरी, लंगडा, आंब्यासह सर्व कलमी आंब्यांना मोहोर लागला आहे. मात्र, पौष महिना संपला तरीही गावरान आंबे बहरलेले नाहीत. त्यामुळे यंदा गावरान आंब्यांसह संकरित आंब्यांचे दर वधारण्याची शक्यता आहे.
जिल्हाभर मोठ्या प्रमाणात कलमी आंबे बहरावर आहेत. मात्र, गावरान आंबे मोहोरलेले क्वचितच दिसून येत आहेत. पूर्वीसारख्या गावरान आंब्याच्या आमराया राहिल्या नाहीत. काही शेतकऱ्यांनी बांधावर अनेक ठिकाणी गावरान आंबे लावले आहेत. शिवाय, शेतकऱ्यांकडून गावरानऐवजी कलमी आंब्याची लागवड करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आमराया संपुष्टात आल्या. आजही अनेकजण गावरान आंब्यांनाच पसंती देतात. मात्र, यंदा गावरान आंब्यांचे प्रमाण कमी आहे.
गावरान आंब्यांना एक वर्ष आड मोहोर का येतो ?
एक वर्ष आड मोहोर येण्याची प्रवृत्ती आंब्यांमध्ये पाहायला मिळते. त्या आंब्यांच्या प्रजातीमधील हा आनुवंशिकपणा आहे. ही प्रवृत्ती संकरित आंब्यांमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे संकरित आंबे लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
आमराया नष्ट, उरली बांधावरची झाडे
जिल्ह्यात अनेक गावांमध्ये आमराया होत्या. . या आमराया आता दिसून येत नाहीत. अनेकांनी सरपणासाठी आमरायांची कत्तल केली, तर काहींनी लाकडांसाठी आमरायांची तोड करून विक्री केली. आता केवळ बांधांवर गावरान आंब्यांची झाडे दिसून येतात
लोणची बनविण्यासाठी कैऱ्यांचा तुटवडा
गावरान आंब्याची झाडे नष्ट होत असल्याने गावरान आंबा फार कमी प्रमाणात आढळून येतो. परिणामी, लोणचं बनविण्यासाठी गावरान कैऱ्या मिळत नाहीत. अनेकजण तर वर्षभर रेडिमेड लोणची बाजारातून खरेदी करतात.
"गावरान आंब्यांना दरवर्षीच बहर येत नाही. अनेक आंबे एक वर्ष आड मोहोरतात. हा त्यांचा आनुवंशिकपणा असतो. कोकणातील अनेक शेतकरी या समस्येवरसुद्धा प्रयोग करून उत्पादन घेतात."
- सुचित लाकडे, विषयतज्ज्ञ, उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र.