कुपोषणाची स्थिती गंभीर

By Admin | Updated: April 15, 2016 01:43 IST2016-04-15T01:43:42+5:302016-04-15T01:43:42+5:30

केंद्र व राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहे.

Malnutrition status is serious | कुपोषणाची स्थिती गंभीर

कुपोषणाची स्थिती गंभीर

३ हजार २५९ तीव्र कुपोषित : १४ हजार ३०७ बालके कमी वजनाची
गडचिरोली : केंद्र व राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहे. अशी परिस्थिती असतानाही गडचिरोली जिल्ह्यातील कुपोषण वाढत असून जिल्ह्यात ३ हजार २५९ बालक तीव्र कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. १४ हजार ३०७ मुलांचे वजन कमी असल्याने आरोग्य यंत्रणाही हादरून गेली आहे. जिल्ह्यातील कुपोषणाची ही स्थिती लक्षात घेऊन आरोग्य विभागही चिंतीत असून डिसेंबर २०१५ मध्ये नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल व त्यांच्या चमूने गडचिरोली जिल्ह्यात दौरा करून कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश प्रशासनाला दिले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात २०१० मध्ये ८ हजार ८६७ बालके अतिकुपोषित होते. तर २०११ मध्ये ५ हजार ४४९ बालके या श्रेणीत होते. २०१२ मध्ये ३ हजार ६५५, २०१३ मध्ये ३ हजार ४०८, २०१४ मध्ये ३ हजार ७८३, २०१५ मध्ये ३ हजार २५९ बालके कुपोषणाच्या गंभीर श्रेणीत आहे. गेल्या वर्षी १७ हजार ५६६ मुले कुपोषणाच्या श्रेणीत मिळाले. यातील ३ हजार २५९ अतिकुपोषित तर १४ हजार ३०७ कमी वजनाचे मुले आढळून आले. प्रशासन मात्र त्या आधीच्या वर्षापेक्षा ही आकडेवारी कमी झाली आहे, असा दावा करून कुपोषणाच्या या गंभीर प्रश्नावर लपवाछपवी करीत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने जिल्ह्यात २०१५ मध्ये ९३ हजार १५३ मुलांची तपासणी केली. त्यात साधारण वजनाचे ७५ हजार ५८७, कमी वजनाचे १४ हजार ३०७ तर अतिकुपोषित श्रेणीतील ३ हजार २५९ मुले आढळल्याची नोंद केली आहे. भामरागड तालुक्यात सर्वाधिक कुपोषित बालके असून आरोग्य प्रशासनाने येथे रेड झोन म्हणून अलर्ट जारी केला आहे.
कुपोषण वाढीमागे रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, अशिक्षितपणा व दारिद्र्य या गोष्टी कारणीभूत असल्याचे आरोग्य प्रशासन नेहमीच सांगत आले आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात रिक्तपदांमुळे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे अस्थिपंजर झाली आहे. अनेक उपकेंद्र, आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नाहीत, जिल्हा परिषदअंतर्गत आरोग्य पर्यवेक्षकांची २७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ १० भरलेली आहेत. १७ पदे रिक्त आहेत. आरोग्य सहायकाची ९३ पदे मंजूर असून ८७ भरलेली आहेत. सहा रिक्त आहे. आरोग्य कर्मचारी (आयसी) ची अनुक्रमे २६६ पैकी ४० व १३६ पैकी ६० पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषद यंत्रणेत ५५६ पदांपैकी ४२७ पदे भरलेली असून १३९ पदे रिक्त आहेत. तर जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्ग १ च्या डॉक्टरांची १८ पैकी केवळ ८ पदे भरलेली असून १० दे रिक्त आहेत. वर्ग २ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३४ पैकी ३३ पदे भरलेले असून १ पद रिक्त आहे.
ग्रामीण भागात कुपोषित मुलांना आहार पुरवठ्याची जबाबदारी अंगणवाडी महिलांवर आहे. कुपोषित मुलांना उपचारासाठी रुग्णालयात व कॅम्पमध्ये ठेवले जाते. यासाठी त्यांच्या पालकांना रोजीही (बुडीत मजुरी) दिली जाते. मात्र त्यानंतरही कुपोषण कमी झालेले नाही. आरोग्य विभागाचे कुपोषण कमी करण्याचे प्रयत्न तोकडे पडत आहे, असे एकूण जिल्ह्याचे चित्र आहे. सरकारी यंत्रणेशिवाय दुसरी आरोग्यसेवा येथे नाही. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Malnutrition status is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.