६५९ गावांमध्ये राबविणार हिवताप सर्वेक्षण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 05:00 IST2022-02-17T05:00:00+5:302022-02-17T05:00:44+5:30
शासनाने २०२१-२२ या आर्थिक वर्षात गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचे सक्रिय संक्रमण होत आहे. त्यामुळे हिवतापाचा समूळ नायनाट करण्यासाठी विशेष शोधमोहीम राबवून समस्याग्रस्त भागाचा शोध घेऊन तेथील सर्व लोकसंख्येचे सर्वेक्षण फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्याच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेत २ लाख २० हजार ७९६ लोकांचे रक्तनमुने आणि १४ हजार ४४ लोकांची आरडीकेद्वारा तपासणी होणार आहे.

६५९ गावांमध्ये राबविणार हिवताप सर्वेक्षण मोहीम
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जंगली भूभागामुळे हिवतापाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या जिल्ह्यात हिवताप सर्वेक्षणासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मनोहर पोरेटी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. दि. १७ फेब्रुवारी ते २० मार्च यादरम्यान ही हिवताप शोधमोहीम ६५९ गावांमध्ये राबविली जाणार आहे.
विशेष हिवताप सर्वेक्षण मोहीम ही जंतूभार १० व त्यापेक्षा जास्त असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. यासाठी ५ तालुके, १५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १११ उपकेंद्र आणि ६५९ गावांची निवड करण्यात आली आहे. त्या गावांमधील आशा वर्कर आणि ९१ क्षेत्र कर्मचारी सर्वेक्षणाचे काम करणार आहेत.
शासनाने २०२१-२२ या आर्थिक वर्षात गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचे सक्रिय संक्रमण होत आहे. त्यामुळे हिवतापाचा समूळ नायनाट करण्यासाठी विशेष शोधमोहीम राबवून समस्याग्रस्त भागाचा शोध घेऊन तेथील सर्व लोकसंख्येचे सर्वेक्षण फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्याच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेत २ लाख २० हजार ७९६ लोकांचे रक्तनमुने आणि १४ हजार ४४ लोकांची आरडीकेद्वारा तपासणी होणार आहे.
आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य ॲड. राम मेश्राम, रुपाली पंदीलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोषकुमार जठार, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. समीर बन्सोडे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. विनोद मशाखेत्री आणि जिल्हा हिवताप अधिकारी व डॉ. कुणाल मोडक आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आराेग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
हिवतापाचे सर्वाधिक रुग्ण गडचिरोलीत
जिल्ह्यातील अनेक गावांची लोकसंख्या फक्त ५० ते ६० असल्यामुळे गावात हिवतापाचा १ किंवा २ रुग्ण आढळला तरी हिवतापाचा इन्डिकेटर २० व त्यापेक्षा जास्त आढळतो. तसेच मान्सून कालावधीत ३० टक्के व त्यापेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मलेरियाच्या रुग्णांपैकी ७० ते ७५ टक्के रुग्ण हे फक्त गडचिरोली जिल्ह्यातील असतात, त्यामुळे हिवताप निर्मूलन करण्याकरिता विशेष उपाययोजनांची आवश्यकता असते.