तेंदूची लिलाव प्रक्रिया पारदर्शक करा

By Admin | Updated: March 9, 2017 01:48 IST2017-03-09T01:48:45+5:302017-03-09T01:48:45+5:30

पेसा कायद्याअंतर्गत पेसा क्षेत्रात तेंदू व बांबूसह सर्वच गौण वनोपजांचे संकलन, विक्री व व्यवस्थापन करण्याचे अधिकार

Make the tendon auction process transparent | तेंदूची लिलाव प्रक्रिया पारदर्शक करा

तेंदूची लिलाव प्रक्रिया पारदर्शक करा

मुख्य वनसंरक्षकांचे आवाहन : स्वबळावर तेंदू संकलन करणाऱ्या ग्रामसभांचे होणार प्रबोधन
गडचिरोली : पेसा कायद्याअंतर्गत पेसा क्षेत्रात तेंदू व बांबूसह सर्वच गौण वनोपजांचे संकलन, विक्री व व्यवस्थापन करण्याचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहे. सन २०१७ च्या तेंदू हंगामात ९८१ ग्रामसभांनी स्वबळावर तेंदू संकलन व व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामसभांनी आर्थिक शोषण टाळण्यासाठी वन विभागाच्या मार्गदर्शनात निविदा व लिलाव प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी, असे आवाहन गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार यांनी केले आहे.
या संदर्भात त्यांनी म्हटले आहे की, मागील दोन वर्षात तेंदूपाने हंगामात तेंदू पानाचे उत्पादन कमी झाल्यामुळे बिडी व्यावसायिकांपुढे तेंदूपानाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा तेंदूपानाला सर्वोत्तम भाव आहे. त्यामुळे अत्यंत कमी दर्जाचे बिगर पेसा क्षेत्रातील तेंदूपान घटकांचे तीन ते पाच पट किंमतीत विक्री झाली आहे. यावर्षी चांगला भाव असल्यामुळे काही तेंदू खरेदीदार ग्रामसभांना परस्पर संपर्क करून कमी भावात तेंदूपाने खरेदीचा व्यवहार करीत असल्याचे वृत्तपत्रातील बातम्यांवरून दिसून आले आहे. मागील वर्षात ग्रामसभांना तेंदू, बांबू विक्रीची व मजुरीची रक्कम पूर्णपणे मिळाली नसल्याने ग्रामसभांची ठेकेदारांनी फसवणूक केल्याची बाब चर्चेत आहे.
ग्रामसभांची फसवणूक होत असल्याचे दिसून आल्याने वन विभाग व जिल्हा प्रशासनाने गंभीर चिंता व्यक्त केली असून यावर उपाययोजना म्हणून ग्रामसभांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. ग्रामसभांनी तेंदू लिलाव व निविदा प्रक्रियेसाठी वृत्तपत्र व इतर माध्यमातून भरपूर प्रसिद्धी दिल्यास जास्तीत जास्त खरेदीदार सहभागी होऊन तेंदूपानाला भरघोस किंमत मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

अशी राबवा तेंदू घटकाची लिलाव प्रक्रिया
ग्रामसभांनी शासन निर्णयातील तरतुदीनुसार गौण वनोपजाची विक्री पारदर्शक लिलाव प्रक्रियेतून करावी, ग्रामसभांनी त्यांच्या क्षेत्रात गोळा होणारे तेंदूपाने अंदाजीत (प्रमाण गोणी) ची संख्या नमूद करून प्रमुख दोन ते तीन वृत्तपत्र लिलाव निविदाबाबत जाहिरात करावी, उघडण्याचा कालावधी दहा ते पंधरा दिवसांच्या अवधीचा ठेवावा, जाहिरातीमध्ये थोडक्यात विक्री, अटी व शर्ती नमूद कराव्या, पुरेसे खरेदीदार हजर झाल्यावरच प्रत्यक्ष जाहीर लिलाव प्रक्रिया करावी, मोजके दोन ते तीन खरेदीदार असल्यास लिलाव प्रक्रिया रद्द करून फेरलिलाव प्रक्रिया दुसऱ्यांदा घ्यावी, एका तालुक्यातील लिलाव प्रक्रियेचे काम तालुक्यातील सर्व गावांनी एकाच ठिकाणी व एकाच ठराविक दिवशी करावी.
 

Web Title: Make the tendon auction process transparent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.