मलेरिया मुक्तीसाठी सूक्ष्म नियोजन करा
By Admin | Updated: December 20, 2015 01:10 IST2015-12-20T01:10:27+5:302015-12-20T01:10:27+5:30
गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी मलेरियाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे.

मलेरिया मुक्तीसाठी सूक्ष्म नियोजन करा
आरोग्य संचालकांच्या सूचना : अहेरीत घेतला आढावा; पेरमिली, भामरागड रूग्णालयांना भेट
अहेरी : गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी मलेरियाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने मलेरियाच्या मुक्तीसाठी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार नियमितपणे कार्य केले पाहिजे, अशा सूचना राज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतिश पवार यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना दिले. त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा अहेरी येथे शनिवारी घेतला.
स्थानिक पंचायत समितीच्या क्रांतिवीर बिरसा मुंडा सभागृहात शनिवारी आरोग्य संचालकांनी जिल्हाभरातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीला राज्याच्या अतिरिक्त आरोग्य संचालक अर्चना पाटील, आरोग्य सहसंचालक डॉ. जगताप, सहायक आरोग्य संचालक डॉ. गणवीर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांच्यासह एटापल्ली, भामरागड, मुलचेरा, सिरोंचा, अहेरी रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
आढावा बैठकीदरम्यान डॉ. पवार, जननी सुरक्षा योजना लसीकरण, मिशन इंद्रधनुष्य, साथरोग, कुष्ठरोग, कुटुंब कल्याण कार्यक्रम, शस्त्रक्रिया, संस्थांतर्गत प्रसुती आदी आरोग्य विषयक बाबींचा आढावा घेतला. मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी संस्थांतर्गत प्रसुतीचे महत्त्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी पटवून दिले पाहिजे. मलेरिया व इतर साथरोगांना आटोक्यात आणण्यासाठी गावोगावी जाऊन औषधोपचार केला पाहिजे. गावपातळीवरील रूग्णांची एबीसी या तीन गटात वर्गवारी करावी व त्याचा आराखडा तयार करावा, असे निर्देश दिले. रिक्त पदे लवकरच भरली जातील, असे आश्वासनही दिले.
फेब्रुवारी महिन्यात आपण पुन्हा याच भागाचा दौरा करणार आहोत. दरम्यान आपण सांगितलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याचे लक्षात आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही आरोग्य संचालकांनी दिला.
अहेरी येथील आढावा बैठकीनंतर पेरमिली प्राथमिक आरोग्य केंद्र, भामरागड ग्रामीण रूग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पालाही भेट दिली. रविवारी ते धानोरा ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन मलेरियाचा आढावा घेणार आहेत. (शहर प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर द्या- जोगेवार
गडचिरोली जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लावली पाहिजे, असे निर्देश आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत राज्य युनिसेफच्या समन्वयक डॉ. चंद्रकला जयस्वाल, सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूरच्या प्राचार्य तथा प्रशिक्षण उपसंचालक डॉ. पद्मजा जोगेवार उपस्थित होत्या. या तिन्ही अधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्तपेढी, बाल रूग्ण विभाग, प्रसुती कक्ष, आयसीयू विभागाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. प्रत्यक्ष रूग्णांसोबत चर्चा केली.
यादरम्यान जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या बाजुला असलेल्या जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्रालाही भेट दिली. यावेळी डॉ. पद्मजा जोगेवार यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले जाणाऱ्या आरोग्य प्रशिक्षणाची माहिती जाणून घेतली. प्रशिक्षणासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. सर्वच आरोग्य कर्मचारी प्रशिक्षीत असल्यास १९ टक्के बाल मृत्यू व मातामृत्यू कमी करता येणे शक्य असल्याचे आंतरराष्ट्रीय संशोधनातून सिध्द झाले आहे. त्यामुळे प्रत्येक आरोग्य कर्मचारी प्रशिक्षीत होईल. याबाबत योग्य काळजी घेतली पाहिजे, असे निर्देश केंद्रातील कर्मचाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हा सामान्य रूग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, डॉ. राहूल ठवरे, डॉ. जयश्री वैद्य, डॉ. रवींद्र चौधरी उपस्थित होते.