गडचिरोली : जिल्हाभरात आतापर्यंत केवळ ५० टक्के धान पिकाची रोवणी झालेली आहे. जिल्ह्यात यंदा पर्जन्यमानही फारच कमी आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यशासनाने गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी राज्यशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.खासदार अशोक नेते यांनी निवेदनात म्हटले आहे की, यंदा जिल्ह्यात तब्बल दीड महिना विलंबाने पाऊस बरसला. यामुळे पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या नष्ट झाल्या. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. त्यानंतर रोवणीच्या हंगामात सुद्धा निसर्गाचा लहरीपणा कायमच राहिला. त्यानंतर आलेल्या तुरळक पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कशीबशी धान पिकाची रोवणी केली. मात्र पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यात ५० टक्के रोवणी झाली आहे. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पीक येण्याची शक्यता फारच कमी आहे. संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. यामुळे शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसावित, अशी मागणी नेते यांनी केली आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेती व्यवसायावरच अवलंबून आहे. येथे कोणतेही उद्योगधंदे नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा
By admin | Updated: August 23, 2014 23:59 IST