गडचिरोली तालुक्यातील २७ ग्रा.पं. मध्ये येणार महिलाराज; आरक्षण झाले जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 19:01 IST2025-07-15T19:00:00+5:302025-07-15T19:01:42+5:30
Gadchiroli : खुल्या प्रवर्गातून १९ ठिकाणी सरपंच होणार आरूढ

Mahilaraj will come in 27 Gram Panchayats of Gadchiroli taluka; Reservation announced
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तालुक्यातील एकूण ५१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत १४ जुलै रोजी येथील पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कला दालनात पार पडली. यात अनुसूचित क्षेत्र, अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केले. तालुक्यातील २७ ठिकाणी महिलाराज येणार आहे.
तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकारी संतोष आष्टीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सोडतीत अनुसूचित जाती सरपंच पदाकरिता पाच ग्रामपंचायती, अनुसूचित जमातीकरिता दोन, नामाप्रसाठी आठ ग्रामपंचायती, सरपंच पदासाठी राखीव ठेवण्यात आल्या. याशिवाय पूर्णतः अनुसूचित क्षेत्रातील १७ व खुल्या प्रवर्गासाठी १९ ग्रामपंचायती सरपंचपदासाठी सोडतद्वारे निश्चित झालेल्या आहेत.
पाच ठिकाणी एससी सरपंच
तालुक्यातील वसा, धुंडेशिवणी, अमिर्झा ग्रा.पं. वर एससी (अनुसूचित जाती) महिला, तर शिवणी व पोर्ला ग्रा.पं. वर एससी सर्वसाधारण सरपंच आरूढ होईल.
१७ ग्रामपंचायती पूर्णतः अनुसूचित क्षेत्रात
तालुक्यातील मारदा, देवापूर, मुरमाडी, गिलगाव बा., मुडझा बु., कनेरी, जमगाव, मारोडा, पोटेगाव ग्रा.पं.चे सरपंच पद महिला तर चांदाळा, सावेला, मरेगाव, मौशिखांब, राजोली, पुलखल, खुर्सा, मेंढा आदी ग्रा.पं. चे सरपंच पद सर्वसाधारणसाठी निश्चित करण्यात आले आहे.
खुल्या प्रवर्गातून १९ ठिकाणी सरपंच होणार आरूढ
इंदाळा, बोदली मा., राजगाटा चक, काटली, दिभना मा., गोगाव, मुरखळा, सावरगाव, टेंभा, येवली आदी ग्रा.पं.वर खुल्या प्रवर्गातील महिला, तर चुरचुरा मा., नगरी, नवरगाव, वाकडी, हिरापूर, कोटगल, डोंगरगाव, गुरवळा, दर्शनी मा. या ग्रा.पं. मधील सरपंच पद खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण (महिला अथवा पुरुष) करिता निश्चित झाले आहे.
'नामाप्र'साठी आठ जागा
आठ जागा 'नामाप्र'साठी राखीव झाल्या. खरपुंडी, अडपल्ली, विहीरगाव, पारडीकुपी ग्रा.पं. वर नामाप्र महिला, आंबेशिवणी, चांभार्डा, जेप्रा, बाह्मणी नामाप्र सर्वसाधारण असतील.