लेकरं विचारताहेत पप्पा कधी येणार..? पत्नी, आईचा काळीज पिळवटणारा हंबरडा

By संजय तिपाले | Updated: February 12, 2025 16:07 IST2025-02-12T16:07:18+5:302025-02-12T16:07:48+5:30

पोलिस मुख्यालयावर फुटला अश्रूचा बांध

Mahesh Nagulwar Children are asking when will daddy come..? Wife, mother's heartbreaking story naxal martyer | लेकरं विचारताहेत पप्पा कधी येणार..? पत्नी, आईचा काळीज पिळवटणारा हंबरडा

लेकरं विचारताहेत पप्पा कधी येणार..? पत्नी, आईचा काळीज पिळवटणारा हंबरडा

संजय तिपाले

गडचिरोली : 'कालपासून लेकरं विचारताहेत पप्पा कधी येणार, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही.. मी त्यांना काय उत्तर देऊ, तुम्हीच सांगा...' अशा काळीज हेलावणाऱ्या शब्दांत शहीद जवान महेश कवडू नागुलवार (वय ३९)यांच्या पत्नी पल्लवी यांनी टाहो फोडला अन् पोलिस अधिकारी-अंमलदारांसह नातेवाईकांही अश्रू अनावर झाले.

माओवाद्यांविरुध्दच्या चकमकीत वीरगती प्राप्त झालेले जवान महेश नागुलवार यांना शोकमग्न वातावरणात १२ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

महेश  नागुलवार   हे २०१० मध्ये जिल्हा पोलिस दलात भरती झाले. सध्या सी- ६० या नक्षलविरोधी पथकात होते. भामरागड तालुक्यातील छत्तीसड सीमेलगतच्या दिरंगी, फुलणार जंगलात ते अन्य जवानांसह १० फेब्रुवारीला नक्षलविरोधी मोहिमेवर गेले होते. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी नक्षल व पोलिसांचा धुमश्चक्री सुरु झाली. तब्बल आठ तास चाललेल्या चकमकीत महेश नागुलवार हे छातीत गोळी लागल्याने जखमी झाले. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात भरती केले, पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. १२ रोजी सकाळी उत्तरीय तपासणीनंतर पार्थिवदेह जिल्हा मुख्यालयात नेण्यात आला.

तेथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी पोलिसांनी हवेत तीन फैरी झाडून महेश नागुलवार यांना आदंराजली वाहिली.
अतिरिक्त पोलिस महासंचालक (विशेष अभियान) राजकुमार व्हटकर, विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षल विरोधी अभियान) संदीप पाटील, उप पोलिस महानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी नागुलवार कुटुंबाचे सांत्वन केले. शहीद जवान महेश नागुलवार यांच्या आई कुंदा, पत्नी पल्लवी, आद्वी (वय ११) व आश्वी (वय ५) या दोन मुली व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला, त्यामुळे संपूर्ण वातावरण सुन्न झाले होते.

माझा बापू कुठं गेला रे...
महेश यांच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले होते. आई कुंदा यांनी हिमतीने संसार सावरला. महेश यांनी पोलिस दलात भरती होऊन आईचे परिश्रम सार्थकी लावले, पण ऐन उमेदीच्या काळात त्यांना हौतात्य आल्याने कुटुंबावर आघात झाला. 'माझा बापू कुठं गेला रे... आम्ही कसे राहावे जी..' अशा शब्दांत आईने हंबरडा फोडला.

Web Title: Mahesh Nagulwar Children are asking when will daddy come..? Wife, mother's heartbreaking story naxal martyer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.