प्रेम, लग्न अन् विश्वासघात... मन हेलावून टाकणारी कथा ! बाळाच्या वाट्याला आले दुर्दैवी भविष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 14:03 IST2025-12-17T14:02:30+5:302025-12-17T14:03:14+5:30
Gadchiroli : चुलत भावाच्या लग्नात बँडबाजाच्या पथकातील तरुणाशी तिची ओळख झाली. पहिल्याच भेटीत प्रेम जुळले. आयुष्यभर साथ देण्याचे वचन देत त्याने तिच्याशी लग्नगाठ बांधली.

Love, marriage and betrayal... A heart-wrenching story! An unfortunate fate befell the baby
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चुलत भावाच्या लग्नात बँडबाजाच्या पथकातील तरुणाशी तिची ओळख झाली. पहिल्याच भेटीत प्रेम जुळले. आयुष्यभर साथ देण्याचे वचन देत त्याने तिच्याशी लग्नगाठ बांधली. मात्र, गर्भधारणा होताच हे नाते विश्वासघातात बदलले. पती अचानक गायब झाला. ना संपर्क, ना जबाबदारी. सासू-सासऱ्यांनीही पाठ फिरवली. आधार तुटलेल्या अवस्थेत तिने गोंडस बाळाला जन्म दिला; मात्र त्याचा सांभाळ करणे तिच्यासाठी अशक्य झाले. अखेर १५ डिसेंबर रोजी स्वतःच्या काळजावर दगड ठेवून तिने बालकल्याण समितीमार्फत या चिमुकल्याला शिशुगृहात दाखल केले. जन्मताच आई-वडिलांच्या मायेपासून दुरावलेल्या या बाळाची कथा मन हेलावून टाकणारी आहे.
एखाद्या चित्रपटालाही शोभेल अशी ही कथा. मीनाक्षी (काल्पनिक नाव) गडचिरोली तालुक्यातील एका खेडेगावातील तरुणी. मे २०२४ मध्ये चुलत भावाच्या लग्नात बँडबाजा वाद्य पथकातील चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील पवन (काल्पनिक नाव) याच्याशी तिची ओळख झाली. काही दिवसांतच त्याने तिला पळवून नेले व १४ मे २०२४ रोजी गावातील मंदिरात मोजक्या नातेवाईकांत विवाह केला. रोजगाराचे साधन नाही तसेच आई- वडिलांची स्थिती बिकट असल्याने मीनाक्षीला बाळाचे संगोपन करणे अशक्य होते. अखेर जड मनाने १२ डिसेंबर रोजी ती गडचिरोली ठाण्याची पायरी चढली. पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तिला धीर दिला. बाल कल्याण समितीने या बाळाला शिशुगृहात पाठविले. निरोपावेळी तिला गहिवरून आले.
पती, सासू- सासऱ्यांचीही पाठ
इकडे पती कंपनीत कामाला गेल्याने मीनाक्षी गर्भावस्थेत आराम व्हावा यासाठी माहेरी आली. २ डिसेंबर २०२५ रोजी तिने जिल्हा महिला व बाल रुग्णालयात मुलाला जन्म दिला. सासरच्यांना ही बातमी दिली, मात्र पती पवन आणि सासू-सासरे कोणीही दवाखान्यात आले नाहीत. त्याचवेळी पवनने दुसऱ्या एका विवाहित महिलेशी लग्न केल्याची माहिती तिला कळाली. त्यामुळे मीनाक्षीच्या पायाखालची जमीन सरकली. लग्नानंतर काही महिन्यांतच पवनचे खरे रूप समोर आले. भाजीपाला व्यवसायासाठी आई-वडिलांकडून पैसे घेऊ ये, असे म्हणत त्याने दारू पिऊन तिला मारहाण सुरू केली. परिस्थिती बदलेल या आशेने ती दिवस काढत होती. मीनाक्षी असतानाही त्याने छळ सुरुच ठेवला. जुलै २०२५ मध्ये 'हैद्राबाद येथे कंपनीत कामासाठी जातो' असे सांगून तो घरातून निघून गेला. नंतर तिने अनेकदा फोन केला तरी संपर्क झाला नाही.