साडेसहा लाखांचे नुकसान

By Admin | Updated: November 26, 2014 23:05 IST2014-11-26T23:05:21+5:302014-11-26T23:05:21+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील पाचही वनविभागात २९ प्रकारचे मांसभक्षी व तृणभक्षी प्राणी आहेत. जंगलालगत असलेल्या शेतात धुडगुस घालून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात धान व अन्य पिकांची

Loss of Rs | साडेसहा लाखांचे नुकसान

साडेसहा लाखांचे नुकसान

साडेतीन वर्षात : वन्यप्राण्यांच्या धुडगुसामुळे शेतकरी हवालदिल
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील पाचही वनविभागात २९ प्रकारचे मांसभक्षी व तृणभक्षी प्राणी आहेत. जंगलालगत असलेल्या शेतात धुडगुस घालून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात धान व अन्य पिकांची नासधूस करतात. यासाठी वनविभागाने अद्यापपर्यंत ठोस उपाययोजना केली नाही. सन २०१०-११ ते २०१४ च्या सप्टेंबर अखेरपर्यंत साडेतीन वर्षाच्या कालावधीत वन्यप्राणांच्या धुडगुसामुळे शेतकऱ्यांचे ६ लाख ६० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पाचही वनविभागात ७८ टक्के जंगल आहे. जंगलाला लागून शेकडो हेक्टर शेती आहे. या शेतामध्ये जिल्ह्यातील शेतकरी धान, सोयाबीन, कापूस, तूर, मुंग, उडीद, चना, गहू, ज्वारी आदीसह विविध प्रकारचे खरीप व रब्बी पिकांची लागवड करतात. याशिवाय कृषी विभागाच्या माध्यमातून अनेक योजनांद्वारे सिंचनाच्या सुविधा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अलिकडे जिल्ह्यातील शेतकरी भाजीपाला पिकांची लागवड करतात. अनेक शेतांना मजबूत स्वरूपाचे ताराचे कुंपन नाही. संरक्षणाअभावी जंगलातील रानडुकर, सांबर, हरिण आदीसह इतर वन्य प्राणी शेतात धुडगुस घालून शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान करतात.
यंदा २०१४ मध्ये खरीप हंगामात अमिर्झा परिसरातील आंबेशिवणी, गिलगाव व इतर गावातील सोयाबिन पिकाची रानडुकराने मोठ्या प्रमाणात नुकसान केली होती. यासंदर्भात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अमिर्झा परिसरातील नुकसान झालेल्या पिकांचे सर्व्हेक्षण केले होते. या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सन २०१०-११ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात पीकहानीचे १९ प्रकरणे झाली. यावर्षात ६० हजार ४२० रूपयाचे वन्य प्राण्यांच्या धुडगुसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. २०११-१२ या वर्षात पीकहानीचे २९ प्रकरणाची नोंद वनविभागाने घेतली असून यावर्षात १ लाख ३३ हजार २५० रूपयाचे नुकसान झाले होते. २०१२-१३ या वर्षात पीकाहानीचे ८४ प्रकरणे घडली. या वर्षात शेतकऱ्यांचे ३ लाख ५१ हजार २३० रूपयाचे नुकसान झाले होते. २०१३-१४ या वर्षात सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पीकहानीचे ९ प्रकरणे घडली असून ६१ हजार १०० रूपयाचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
वनविभागामार्फत पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत दिली जाते. वनविभागाच्यावतीने सन २०१०-११ ते २०१२-१३ या वर्षातील पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली असल्याची माहिती आहे.
गडचिरोली जिल्ह्यात ७५ टक्क्याहून अधिक लोक शेती व्यवसाय करतात. जिल्ह्यात कोणतेही उद्योगधंदे नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावर अवलंबून आहे. एकूणच गडचिरोली जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. निसर्गाचा लहरीपणा, पूर परिस्थिती, अतिवृष्टी तसेच कोरड्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नेहमीच तोट्याची शेती अनुभवावी लागत आहे. अलिकडे जंगलालगतच्या शेतांमध्ये वन्यप्राण्यांच्या धुडगुसाचे प्रमाण वाढले आहे.
वन्यप्राण्यांच्या धुडगुसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सदर बाब गंभीर असल्याने शासनाने कृषी विभागामार्फत आदिवासी व गैरआदिवासी शेतकऱ्यांना १०० टक्के सवलतीवर ताराच्या कुंपनाचे वितरण करण्याची योजना हाती घ्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील आदिवासी व गैरआदिवासी शेतकऱ्यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Loss of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.