Lok Sabha Election 2019; वरिष्ठांच्या बुस्टरनंतर ‘हम साथ-साथ है’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:46 IST2019-04-01T22:46:26+5:302019-04-01T22:46:47+5:30
लोकसभेच्या रिंगणात एकूण ५ राजकीय पक्षांचे उमेदवार असले तरी मुख्य लढतीमधील उमेदवारांसाठी नेत्यांच्या प्रचारसभांना सुरूवात झाली आहे. या सभांमध्ये आता वरिष्ठ नेत्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून उमेदवारांसोबत त्यांच्या पक्षाचे सर्व नेते बसत असल्यामुळे ‘हम साथ साथ है’चे दृष्य पहायला मिळत आहे.

Lok Sabha Election 2019; वरिष्ठांच्या बुस्टरनंतर ‘हम साथ-साथ है’
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकसभेच्या रिंगणात एकूण ५ राजकीय पक्षांचे उमेदवार असले तरी मुख्य लढतीमधील उमेदवारांसाठी नेत्यांच्या प्रचारसभांना सुरूवात झाली आहे. या सभांमध्ये आता वरिष्ठ नेत्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून उमेदवारांसोबत त्यांच्या पक्षाचे सर्व नेते बसत असल्यामुळे ‘हम साथ साथ है’चे दृष्य पहायला मिळत आहे.
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या उमेदवारीचा सस्पेन्स दूर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांमध्ये काहीशी नाराजी होती. त्यामुळे सुरूवातीला त्यांचा प्रचारातील सहभागही नगण्य होता. परंतू नंतर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्व नेते व पदाधिकाऱ्यांना ‘बुस्टर डोज’ देत कामी लागण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता नेत्यांच्या प्रचारसभांपासून तर गावोगावच्या प्रचारातही त्यांचा सहभाग वाढला आहे.
मतदार संघातील ६ पैकी ५ आमदार भाजपचे आहेत. आपापल्या क्षेत्रात पक्षाच्या उमेदवाला मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आल्यामुळे ते कामाला लागले आहेत. डॉ.देवराव होळी यांनी तर प्रसिद्धी पत्रक काढून आपण उमेदवारीच्या स्पर्धेत नव्हतो, पक्षाकडूनच विचारणा झाली होती, असे सांगून आपण एकदिलाने कामाला लागल्याचे स्पष्ट केले. बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपची सत्ता असल्याने त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे भाजप-सेनेत ताणलेल्या संबंधानंतर शेवटच्या टप्प्यात झालेली युती कितपत फायदेशिर ठरेल? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. परंतू युती धर्म पाळत शिवसेनेचे पदाधिकारी कामी लागल्यामुळे भाजपच्या नेत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
काँग्रेस आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्टÑवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा दक्षिण गडचिरोलीतील प्रचार सभांमध्ये भाग घेत आहेत. रविवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रचारसभांमध्ये ते सोबत होते. परंतू इतर भागात काँग्रेसला अजूनही नेत्यांची अपेक्षित साथ मिळालेली नाही.
सोशल मीडियाचा वापर कमीच
यावेळी प्रचारात सोशल मिडियाचा वापर अधिक प्रभावी ठरेल, असे चित्र दिसत होते. मात्र जिल्ह्यात सोशल मिडियाचा वापर अजूनही मर्यादित स्वरूपातच होत आहे. नेत्यांच्या होणाऱ्या प्रचार सभा किंवा झालेल्या प्रचार सभांची माहिती देण्यापलीकडे सोशय मिडियाचा वापर होताना दिसत नाही. उमेदवारांची प्रतिमा उजळणाºया किंवा निवडून आल्यास करणार असलेल्या कामांच्या आश्वासनांच्या पोस्टही अद्याप दिसत नाही.
भाजपच्या दिमतीला नागपूरची फौज
मतदार संघात भाजपच्या प्रचाराचे नियोजन आणि नियंत्रणासाठी नागपूरवरून खास कार्यकर्त्यांची फौज गडचिरोलीत डेरेदाखल झाली आहे. प्रचाराच्या नियोजनात मार्गदर्शन करण्यासोबतच प्रचार यंत्रणेवर ‘वॉच’ ठेवण्याचे काम ते करत आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रचार यंत्रणेत इतर पक्षांच्या तुलनेत अधिक सुसूत्रता दिसून येत आहे. काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेत या गोष्टींचा अभाव दिसत असल्याने कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवणे त्यांना अवघड झाले आहे.
आचारसंहिता भंगाचे पाच गुन्हे दाखल
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यासंदर्भात प्रशासनाने आतापर्यंत पाच गुन्ह्यांची नोंद केली आहे. यामध्ये दारूसाठा व रोख रक्कम बाळगणे यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, याकरिता जिल्हा प्रशासन दक्ष असून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.