लहान झेलियावासीयांना रस्त्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:32 IST2021-03-15T04:32:51+5:302021-03-15T04:32:51+5:30

धानोरा : तालुका मुख्यालयापासून ४१ किमी अंतरावर असलेल्या कटेझरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या लहान झेलिया या गावाला जाण्यासाठी ...

Little Zelia residents waiting for the road | लहान झेलियावासीयांना रस्त्याची प्रतीक्षा

लहान झेलियावासीयांना रस्त्याची प्रतीक्षा

धानोरा : तालुका मुख्यालयापासून ४१ किमी अंतरावर असलेल्या कटेझरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या लहान झेलिया या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे जंगलातून पायवाट तुडवत गाव गाठावे लागते. गावाला जातेवेळी दोन मोठमोठे नाले पडतात. पावसाळ्यात या नाल्यांमध्ये पाणी राहात असल्याने रहदारी पूर्णपणे ठप्प होते. अशा स्थितीत स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही हे गाव खऱ्या स्वातंत्र्यापासून वंचितच आहे.

हे गाव कटेझरीपासून पाच किमी अंतरावर आहे. मुरूमगाव-कटेझरीपर्यंत डांबरी रस्ता आहे. कटेझरीवरून मात्र या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. या गावात एकूण १७ घरे आहेत. लोकसंख्या १२०च्या जवळपास आहे. गावात जिल्हा परिषदेची शाळा असून, पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत शिक्षणाची सोय आहे. गावाला जाण्यासाठी दोन मोठे नाले पडतात. नाल्यांवर पुलाचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे पावसाळ्यात नाल्यातील पाणी पार करून गावकऱ्यांना जावे लागते. पक्का रस्ता नसल्याने चारचाकी तर जातच नाही. मोठ्या कठीण प्रसंगाचा सामना करीत दुचाकी गावापर्यंत पोहोचते. पावसाळ्याच्या दिवसात नाल्यात पाणी राहत असल्याने दुचाकीही जात नाही. गरोदर माता किंवा गंभीर स्थितीतील रुग्ण रस्त्याअभावी दगावण्याचा धोका आहे.

२०१८मध्ये विजेचे खांब लावण्यात आले होते. परंतु अजूनपर्यंत गावात वीज पोहोचली नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांनी अजूनपर्यंत विजेचा प्रकाश बघितला नाही. दिव्याच्या मिनमिनत्या प्रकाशातच रात्र काढावी लागते. गावासभोवताल जंगल असल्याने साप, विंचू यांची भीती आहे. गावाची लोकसंख्या कमी आहे. तसेच गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, विधान परिषद निवडणुकीदरम्यान उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते गावात येत नाही. त्यामुळे गावातील समस्या शासन व प्रशासनाच्या लक्षात येत नाही. रस्ता बांधून द्यावा, यासाठी प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला. मात्र प्रशासन व शासनाने दुर्लक्ष केले आहे.

Web Title: Little Zelia residents waiting for the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.