दारूविक्रेत्यास केले स्थानबद्ध
By Admin | Updated: January 28, 2017 01:19 IST2017-01-28T01:19:18+5:302017-01-28T01:19:18+5:30
अहेरी येथील अवैध दारूविक्रेता संजय राजय्या रत्नावार (४८) याला एमपीडीए कायदा १९८१ अन्वये कारवाई करून

दारूविक्रेत्यास केले स्थानबद्ध
चंद्रपूरच्या कारागृहात पाठविले : एमपीडीए कायद्यांतर्गत जिल्ह्यातील दुसरी कारवाई
आलापल्ली : अहेरी येथील अवैध दारूविक्रेता संजय राजय्या रत्नावार (४८) याला एमपीडीए कायदा १९८१ अन्वये कारवाई करून त्याची रवानगी चंद्रपूर जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजर करणाऱ्या व्यक्तींवर आळा घालण्यासाठी अधिनियम १९८१ चे कलम ३ (१) अन्वये स्थानबध्दतेची कार्यवाही करण्यात येते. स्थानबध्द करण्यात आलेला संजय रत्नावार हा गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू तस्करी करणे, बाळगणे व विक्री करणे अशा प्रकारच्या बेकायदेशिर कृत्यामध्ये असल्याने त्याच्याविरूध्द दारूबंदी अधिनियमांतर्गत प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्ह्यात १०० टक्के दारूबंदी व्हावी याकरीता शासनाने नवनवीन योजना राबविल्या आहेत. दारूबंदी कायद्यात सुधारणा व्हावी, याकरीता दारूबंदी सदराखालील दाखल गुन्हे अजामिनपात्र केले असतानाही सदर स्थानबध्द इसमाने अवैध दारूविक्रीचा व्यवसाय सोडला नाही. यामुळे त्याच्याविरूध्द ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ अन्वये स्थानबध्दतेची कार्यवाही करण्याबाबत अहेरीचे ठाणेदार संजय मोरे यांना निर्देश दिले होते. ठाणेदार मोरे यांनी संजय रत्नावार याच्याविरूध्द स्थानबध्दतेचा प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावास जिल्हाधिकारी ए.एस. आर. नायक यांनी मान्यता दिल्याने बुधवारी २५ जानेवारी रोजी त्याची चंद्रपूर जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. एमपीडीए कायदा १९८१ अन्वये करण्यात आलेली गडचिरोली जिल्ह्यातील ही दुसरी कारवाई आहे. (प्रतिनिधी)