लिंगमपल्लीची शाळा उघडते केवळ १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 06:00 AM2019-12-15T06:00:00+5:302019-12-15T06:00:33+5:30

अहेरी पंचायत समिती अंतर्गत कमलापूरपासून केवळ चार ते पाच किमी अंतरावर लिंगमपल्ली हे गाव आहे. सदर गाव रेपनपल्ली गटग्रामपंचायत अंतर्गत येते. या गावात आदिवासी समाज व एनटी प्रवर्गाचे लोक वास्तव्य करतात. येथे ४० ते ५० घरे आहेत. सदर गावातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा व्हावी, या हेतुने सदर गावी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली.

Lingampalli School opens only on 15th August and 26th January | लिंगमपल्लीची शाळा उघडते केवळ १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला

लिंगमपल्लीची शाळा उघडते केवळ १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला

Next
ठळक मुद्देशिक्षकाचा पत्ता नाही । अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

श्रीधर दुग्गीरालापाटी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : शिक्षणाच्या अधिकार अधिनियमानुसार एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासन व प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जातात. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे अहेरी उपविभागातील बऱ्याचशा शाळा नेहमी बंदस्थितीत दिसून येतात. कमलापूर नजीकच्या लिंगमपल्ली येथील शाळा केवळ १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला ध्वजारोहणाच्या निमित्ताने उघडत असल्याचे वास्तव उजेडात आले आहे.
अहेरी पंचायत समिती अंतर्गत कमलापूरपासून केवळ चार ते पाच किमी अंतरावर लिंगमपल्ली हे गाव आहे. सदर गाव रेपनपल्ली गटग्रामपंचायत अंतर्गत येते. या गावात आदिवासी समाज व एनटी प्रवर्गाचे लोक वास्तव्य करतात. येथे ४० ते ५० घरे आहेत. सदर गावातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा व्हावी, या हेतुने सदर गावी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. लिंगमपल्ली येथील शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा असून या शाळेत केवळ एक शिक्षक कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या शाळेत असलेले एकमेव शिक्षक दररोज शाळेत येत नसल्याने ही शाळा नेहमी कुलूपबंद राहते. १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिन व २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमासाठी सदर शाळा उघडल्या जाते. इतर दिवशी शाळा कुलूपबंद असते. यासंदर्भात शिक्षण सभापती अजय कंकडालवार यांना विचारले असता यासंदर्भात अद्याप कोणतीही तक्रार आली नसून असा प्रकार असेल तर चौकशी करून कारवाई केली जाईल असे ते म्हणाले.

अधिकारी नॉट रिचेबल
प्रस्तूत प्रतिनिधींनी लिंगमपल्ली गावात भेट देऊन शाळेची पाहणी केली असता, शाळा कुलूपबंद राहात असल्याचे विदारक वास्तव दिसून आले. या संदर्भात अहेरी पं.स.चे संवर्ग विकास अधिकारी प्रफुल महेशकर व गट शिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. मात्र त्यांचा मोबाईल सतत नॉट रिचेबल दाखवत होता.

Web Title: Lingampalli School opens only on 15th August and 26th January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा