न्यायालयाचा निर्णय : २०११ मध्ये गुरवळा मार्गावर घडला थरारगडचिरोली : किराणा मालाच्या उधारीची रक्कम देण्याच्या नावाखाली निर्जनस्थळी बोलावून गडचिरोली शहरातील एका किराणा व्यावसायिकाची हत्या करणाऱ्या आरोपीस गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेप व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.गणेश पिठाले रा. शिवणी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने गडचिरोली येथील किराणा व्यावसायिक अकबरभाई वडसरीया यांची २६ मार्च २०११ रोजी गुरवळा मार्गावरील निर्जनस्थळी खाणीमध्ये हत्या केली. अकबरभाई वडसरिया यांचे गडचिरोली येथे किराणा दुकान आहे. ते गडचिरोली परिसरातील आजुबाजुच्या खेड्यातील किराणा दुकानदारांना माल उधारी व नगदी स्वरूपात पुरवत होते. शिवणी येथील गणेश पिठाले हा किरकोळ किराणा दुकानदार वडसरिया यांचा नेहमीचा ग्राहक होता. पिठाले हा वडसरीया यांच्याकडून उधारीवर किराणा माल नेहमी नेत होता. वडसरिया यांची किराणा मालाची उधारी गणेश पिठाले यांच्याकडे शिल्लक होती. वडसरीया यांनी पिठाले यांना अनेकदा किराणा मालाच्या उधारीची रक्कम मागितली. मात्र पिठाले याने उधारीची रक्कम दिली नाही. दरम्यान, गणेश पिठाले याने किराणा व्यावसायिक अकबरभाई वडसरिया यांना जीवे मारण्याचा कट रचला व निर्घृण हत्या केली. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. एस. इंगवले यांनी तपासाची चक्र गतीने फिरवून आरोपी गणेश पिठाले याला अटक केली व त्याच्या विरोधात गडचिरोली पोलीस ठाण्यात भादंविचे कलम ३०२, ३९२ व २०१ अन्वये गुन्हा दाखल केला. सदर प्रकरण गडचिरोलीच्या जिल्हा न्यायालयात दाखल करून आरोपी गणेश पिठाले याच्या विरोधात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सूर्यकांत शिंदे यांनी या खटल्यातील सर्व साक्षीपुरावे तपासून व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून आरोपी गणेश पिठाले याला भादंविचे कलम ३०२ अन्वये जन्मठेप व दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. कलम ३९२ अन्वये एक वर्ष शिक्षा व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. (स्थानिक प्रतिनिधी)असा घडला गुन्हागणेश पिठाले याने २६ मार्च २०११ रोजी अकबरभाई वडसरिया यांना फोन करून किराणा मालाच्या उधारीची रक्कम देण्यास तयार असल्याचे सांगितले. व त्यांना गुरवळा मार्गावर बोलाविले. त्यानुसार अकबरभाई वडसरिया हे उधारीची रक्कम घेण्यासाठी गुरवळा मार्गावर गेले. दरम्यान, पिठाले याने तिथेच वडसरिया यांची निर्घृणपणे हत्या केली. तसेच वडसरिया यांच्या मौल्यवान वस्तू घेऊन गेला. घटनास्थळावरून पिठाले याने हत्या प्रकरणाचा पुरावा नष्ट केला. सदर घटना उघडकीस आल्यावर मृतक अकबर वडसरिया यांच्या भावाने गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
किराणा व्यावसायिकाची हत्या करणाऱ्यास जन्मठेप
By admin | Updated: June 25, 2016 01:12 IST