Lessons for teachers of quality enhancement | गुणवत्ता वाढीचे शिक्षकांना धडे
गुणवत्ता वाढीचे शिक्षकांना धडे

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन : शालांत परीक्षेचा निकाल उंचवा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली, अहेरी, भामरागड प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांतील तसेच जिल्ह्यातील जि.प. हायस्कूलमधील इयत्ता दहावीला शिकविणाºया माध्यमिक शिक्षकांची कार्यशाळा रविवारी येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत पार पडली.
आकांक्षित जिल्हा कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या संकल्पनेतून सदर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे म्हणाले, मागील वर्षी जिल्ह्यात इयत्ता दहावीचा निकाल कमी लागला त्यादृष्टीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे गरजेचे आहे. विद्यार्थी कुठे कमी पडतो हे जाणून शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे. विद्यार्थी प्रगत झाले पाहिजे यासाठी शिक्षकांनी मनापासून काम करावे. यावर्षीचा निकाल उंचावण्यासाठी अशा कार्यशाळेची आवश्यकता आहे. कार्यशाळेतून दिशा मिळते व पुढील उपाययोजना करता येतात. त्यासाठी शिक्षकांचा सामूहिक सहभाग व परिश्रम आवश्यक आहे.
डीआयईसीपीडीचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले वर्गात विद्यार्थ्यांची अनियमितता, विद्यार्थ्यांचा अध्ययनात आवश्यक प्रतिसाद न मिळणे, परीक्षेचे पॅटर्न बदलणे, परीक्षेचा पाहिजे तसा सराव झाला नाही आदी कारणे निकाल कमी लागण्यास पुढे आलेली आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शिकविलेला पाठ्यांश समजला की नाही याचा शिक्षकांनी शोध घेऊन परीक्षेसबंधात विद्यार्थ्यांची तयारी करून घ्यावी. विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट असाव्या. आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकांमध्ये इष्ट बदल होणे अपरिहार्य आहे.
यावेळी डीआयईसीपीडीचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. विनीत मत्ते, वैशाली येगलोपवार, पुनित मातकर, सहायक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर, मुख्याध्यापक डी. डी. शेंडे आदी उपस्थित होते.
गडचिरोली प्रकल्पातील २४, अहेरीतील ११ व भामरागड प्रकल्पातील ८ अशा एकूण ४३ शासकीय आश्रमशाळातील तसेच जिल्ह्यातील १० जि.प. हायस्कूलचे एकूण २१५ माध्यमिक शिक्षकांचा या कार्यशाळेत सहभाग होता. या कार्यशाळेत सहभागी सर्व माध्यमिक शिक्षकांची शेवटी विषयनिहाय चाचणी घेण्यात आली. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी आश्रमशाळांतील व डीआईसीपीडीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.


Web Title: Lessons for teachers of quality enhancement
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.