१०० शेतकऱ्यांनी गिरविले सगुणा पध्दत भात लागवडीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 02:55 IST2016-06-13T02:55:09+5:302016-06-13T02:55:09+5:30
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गडचिरोलीच्या वतीने रविवारी येथील माविमच्या प्रांगणात सगुणा पध्दतीने भात लागवड बाबत कार्यशाळा घेण्यात आली.

१०० शेतकऱ्यांनी गिरविले सगुणा पध्दत भात लागवडीचे धडे
अंमलबजावणी करण्याचे चंद्रशेखर भारसावले यांचे आवाहन : कृषी महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी उपस्थित
गडचिरोली : महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गडचिरोलीच्या वतीने रविवारी येथील माविमच्या प्रांगणात सगुणा पध्दतीने भात लागवड बाबत कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत बचत गटातील १०० पुरूष व महिला शेतकऱ्यांसह कृषी महाविद्यालयाचे ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. सगुणा पध्दतीने भात लागवड केल्यास कमी खर्चात अधिक उत्पादन मिळत असल्याने या पध्दतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन रायगडचे कृषीतज्ज्ञ चंद्रशेखर भारसावले यांनी केले.
विशेष अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे होते. विशेष अतिथी म्हणून रायगडचे अनिल निवलकर, राजेश वाणी तर प्रमुख अतिथी म्हणून माविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा, अश्विनी जांभुळकर, माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी मोहन घनोटे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना भारसावले म्हणाले, आपल्याकडची शेती नैसर्गिक वातावरणावर अवलंबून असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो. कमी खर्चाची, कमी श्रमाची, कमी नुकसानीची व जास्त उत्पन्न देणारी शेतीची पध्दती म्हणजेच सगुणा पध्दतीने भात लागवड होय. कार्यक्रमाचे संचालन प्रांजली वसाके यांनी केले तर आभार चारूदत्त वाढई यांनी मानले. सदर कार्यशाळेला निलेश सांगोले, सचिन नरूले, सतीश प्रधान, विक्रम त्रिपदे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
पहिल्या टप्प्यात दोन हजार एकरात एसआरटी पध्दतीने लागवड
माविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी, उपजीविका सल्लागार, तालुका व्यवस्थापक, सहयोगिनी व गावातील प्रेरक महिलांनी आत्मा कार्यालयाच्या सहकार्याने रायगड येथे अभ्यासदौरा केला व तेथून सगुणा पध्दतीने भात लागवडीचे तंत्रज्ञान आत्मसात केले. या पध्दतीने भात लागवड करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून तीन वर्षात २०० गावात १० हजार एकर पर्यंत एसआरटी पध्दतीने भात लागवड करण्याचे ठरविण्यात आले. पहिल्या टप्प्यात या वर्षात दोन हजार एकरपर्यंत सगुणा पध्दतीने भात लागवड करण्याचे ठरविण्यात आले आहे. या बाबत कृषी विज्ञान केंद्रातर्फे मुल्यांकन करण्यात येणार आहे.