वज्राघाताने ३६ जणांचा बळी

By Admin | Updated: June 27, 2017 00:57 IST2017-06-27T00:57:06+5:302017-06-27T00:57:06+5:30

भर पावसाळ्यात चालणारी धान रोवणीची कामे, जंगलव्याप्त भाग यामुळे गडचिरोली जिल्ह्यात वीज कोसळण्याचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे.

At least 36 people were killed in the accident | वज्राघाताने ३६ जणांचा बळी

वज्राघाताने ३६ जणांचा बळी

पाच वर्षांतील स्थिती : वीज पडल्यामुळे सर्वाधिक मनुष्य हानी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भर पावसाळ्यात चालणारी धान रोवणीची कामे, जंगलव्याप्त भाग यामुळे गडचिरोली जिल्ह्यात वीज कोसळण्याचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. गेल्या पाच वर्षात वीज पडून सुमारे ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. मे ते जून २०१७ मध्ये दोन महिन्यांच्या कालावधीत सुमारे सहा जणांचा बळी गेला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. धानाच्या रोवणीची कामे पावसाळ्यातच करावी लागतात. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांना ऐन पावसाळ्यात शेतावर राहिल्याशिवाय पर्याय राहत नाही. शेतीची कामे सुरू असतानाच वीज पडून नागरिकांचा मृत्यू होतो. गडचिरोली जिल्ह्यात जंगलाचेही प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मेघगर्जना सुरू झाल्यानंतर मोकळ्या जागेत जाण्याची संधी नागरिकांना मिळत नाही. चारही बाजूने जंगल राहत असल्याने झाडांवर वीज कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे. वीज कोसळण्यापासून स्वत:चा बचाव करण्याच्या काही उपाययोजना असल्या तरी या उपाययोजनांबाबत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये फारशी जनजागृती नाही. त्यामुळे नागरिक वज्राघाताचे शिकार बनतात. २०१३ मध्ये चार, २०१४ मध्ये आठ, २०१५ मध्ये सात, २०१६ मध्ये ११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मे व जून २०१७ या कालावधीत सुमारे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोरची तालुक्यातील एक नागरिक व मुलचेरा तालुक्यातील पाच नागरिकांचा समावेश आहे. शेळ्या, मेंढ्या, बैल यांच्यावरही वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत.
मागील पाच वर्षांच्या आकडेवारीकडे नजर टाकल्यास दरवर्षी वीज पडून नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
विजा कडकडण्यास सुरुवात झाल्यानंतर लगेच शेताजवळील एखादे घर असल्यास घराचा आसरा घ्यावा, पाण्यात असाल तर तत्काळ बाहेर यावे, झाडाच्या उंचीपेक्षा झाडापासून दुप्पट अंतरावर उभे राहावे, ओल्या शेतात रोप लावण्याचे व अन्य काम करणाऱ्या व्यक्तींनी तत्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे, शेतात काम करीत असाल तर सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतला नसेल तर शक्यतो जेथे आहात तेथेच राहावे, शक्य असले तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाठ अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवावा, दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात टेकवून डोके जमिनीकडे झुकवा तथा डोके जमिनीवर ठेवू नका, धातूपासून बनलेल्या वस्तू जसे कृषी यंत्र इत्यादीपासून दूर राहावे.

वीज
पडून हानीचे प्रमाण अधिक
२०१३ ते २०१६ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मनुष्य हानीचे विश्लेषण आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. यामध्ये सर्वाधिक ३० जणांचा मृत्यू वज्राघातामुळे झाला आहे. याच कालावधीदरम्यान पुरामुळे १५ नागरिकांचा, इतर कारणांमुळे तीन नागरिकांचा तर अतिवृष्टी झाल्यामुळे एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. यावरून सर्वाधिक मनुष्यहानी वज्राघातामुळे झाली असल्याचे दिसून येते.
गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्याचबरोबर नदी, नाल्यांचीही संख्या अधिक आहे. परिणामी पुराचा फटका दरवर्षीच हजारो नागरिकांना बसतो. पुरामुळे सर्वाधिक हानी २०१३ साली झाली आहे. यावर्षी सुमारे सात नागरिक मृत्यूमुखी पडले.

Web Title: At least 36 people were killed in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.