लोकबिरादरीच्या वर्धापन सोहळ्याचा शुभारंभ
By Admin | Updated: December 23, 2014 23:03 IST2014-12-23T23:03:06+5:302014-12-23T23:03:06+5:30
२३ डिसेंबर १९७३ रोजी समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचा ४१ वा वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटन मंगळवारला थाटात करण्यात आला.

लोकबिरादरीच्या वर्धापन सोहळ्याचा शुभारंभ
भामरागड : २३ डिसेंबर १९७३ रोजी समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचा ४१ वा वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटन मंगळवारला थाटात करण्यात आला.
समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी आदिवासी संस्कृतीचे प्रतिक असलेल्या गोटुलचे फित कापून उद्घाटन केले. तसेच डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी कर्मयोगी बाबा आमटे, दिवंगत साधनाताई आमटे यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी आमटे परिवारातील डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे, अनिकेत आमटे, समिक्षा आमटे व लोकबिरादरी आश्रमशाळेचे प्राचार्य तळवेकर उपस्थित होते. विशेष म्हणजे, पुण्या, मुंबई येथून आलेले अनेक मान्यवर व तरूणाई उपस्थित होते.
याप्रसंगी लोकबिरादरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गंमत जत्रा पाहून आमटे परिवारांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. वर्धापन दिन सोहळ्याच्या आज पहिल्या दिवशी दिवसभर या ठिकाणी निबंध स्पर्धा, सामान्य ज्ञान, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेले माडीया गाव आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. सायंकाळच्या सुमारास विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या भव्यदिव्य सोहळ्याला मुंबईवरून आलेले पर्यटक, पाहुणे, हेमलकसा परिसरातील आदिवासी नागरिक, आश्रमशाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान लोकबिरादरी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची उत्साह द्विगुणीत झाला होता.
(तालुका प्रतिनिधी)