Landmine sacked by police in Gadkiroli | गडचिरोलीत नक्षल्यांनी पेरलेला भूसुरूंग पोलिसांनी केला निकामी
गडचिरोलीत नक्षल्यांनी पेरलेला भूसुरूंग पोलिसांनी केला निकामी

ठळक मुद्दे१५ किलोचा क्लेमोर माईनघातपाताचा डाव उधळला

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रस्त्यालगत भूसुरूंग पेरून त्याचा स्फोट घडविण्याचा नक्षलवाद्यांचा डाव पोलिसांच्या सतर्कतेने उधळल्या गेला. भूसुरूंग पेरल्याचे वेळीच लक्षात आल्याने पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या मदतीने तो निकामी केला. भामरागड तालुक्यातील लाहेरी-धोडराज मार्गावर हा प्रकार घडला.
प्राप्त माहितीनुसार, छत्तीसगड सीमेतील अबुझमाड जंगल परिसरात दि.२९ व ३० रोजी झालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचा प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त करत २ नक्षलवाद्यांना ठार केले होते. त्यावेळी नक्षलवाद्यांचे साहित्य आणि दस्तावेज पोलिसांच्या हाती लागले होते. त्यावरून नक्षलवादी घातपात घडविण्याची तयारी करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. दरम्यान भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या लाहेरी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील लाहेरी ते धोडराज रस्त्यावर शोध अभियान राबविले असता त्या रस्त्यालगत क्लेमोर माईन पेरून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले. त्याचे वजन अंदाजे १५ किलोग्रॅम होते.
गडचिरोलीवरून बॉम्ब शोधक व नाशक पथकाला तातडीने पाचारण केल्यानंतर या चमूने घटनास्थळीच तो सुरक्षितपणे निकामी केला. त्यामुळे पुन्हा एकदा नक्षल्यांचा डाव उधळल्या गेला. सदर बॉम्ब शोधून काढणाºया पथकाचे तसेच बॉम्बशोधक व नाशक पथकाचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अभिनंदन करून त्या पथकांना पारितोषिक घोषित केले आहे.

Web Title: Landmine sacked by police in Gadkiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.