पार्किंगअभावी वाहने ठेवतात रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:22 IST2021-03-29T04:22:45+5:302021-03-29T04:22:45+5:30
सिरोंचा येथील बँक ऑफ इंडिया शाखेत तालुक्याच्या ग्रामीण भागातून माेठ्या प्रमाणावर ग्राहक आर्थिक व्यवहार करण्यासाठी येतात. बँकेत येणाऱ्या ग्राहकांसाठी ...

पार्किंगअभावी वाहने ठेवतात रस्त्यावर
सिरोंचा येथील बँक ऑफ इंडिया शाखेत तालुक्याच्या ग्रामीण भागातून माेठ्या प्रमाणावर ग्राहक आर्थिक व्यवहार करण्यासाठी येतात. बँकेत येणाऱ्या ग्राहकांसाठी साेयी-सुविधा, तसेच दुचाकी-चारचाकी वाहने ठेवण्यासाठी पार्किंगची साेय असणे आवश्यक आहे. बँकेने तशी व्यवस्था येथे करणे गरजेचे हाेते. बँकेची शाखा सुरू करताना ग्राहकांना कोणत्या सुविधा देता येऊ शकतात, याचा विचार करणे आवश्यक हाेते. मात्र, खातेदारांना साेयी-सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तालुक्यात बँकेसमोर पार्किंग नसल्याने बँकेत येणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावरच ठेवली जातात. सिराेंचा येथे ग्राहकांना रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करून ठेवावी लागतात. दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने ये- जा करणाऱ्या वाहनांची धडक हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिरोंचा तालुका मुख्यालयातच राष्ट्रीयीकृत बँक उपलब्ध आहे. त्यामुळे याठिकाणी ४० ते ५० कि.मी. अंतरावरून पातागुडम, राेमपल्ली, साेमनपल्ली, आसरअल्ली, रंगधामपेठा आदी गावांतील ग्राहक आर्थिक व्यवहार करण्यासाठी येतात. अनेक जण दुचाकी वाहनाने येथे येतात. त्यांना याठिकाणी वाहन ठेवण्यासाठी पार्किंगची व्यवस्था नसल्याने प्रचंड त्रास होत आहे.
बाॅक्स
अंकिसा व आसरअल्ली येथे मिनी बँकेची गरज
सिराेंचा तालुक्यातील अंकिसा येथे विदर्भ, कोकण ग्रामीण बँक व आसरअल्ली येथे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा आहे. परिसरात राष्ट्रीयीकृत बँक नाही. त्यामुळे विविध शासकीय कामांकरिता नागरिक व विद्यार्थ्यांना तालुका मुख्यालयात राष्ट्रीयीकृत बँकेत जाऊन खाते उघडावे लागते. ४० ते ५० कि.मी. अंतरावर जाऊन बँकेतील काम आटाेपणे नागरिकांना अनेकदा शक्य हाेत नाही. त्यामुळे अंकिसा व आसरअल्ली येथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा स्थापन करावी किंवा येथे मिनी बँक स्थापन करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.