उपबाजार समितीत सुविधांचा अभाव
By Admin | Updated: November 16, 2014 22:50 IST2014-11-16T22:50:42+5:302014-11-16T22:50:42+5:30
जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजरपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या देसाईगंज उपबाजार समितीत मोठ्या प्रमाणात धान्य विक्रीसाठी आणल्या जाते. मात्र या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव

उपबाजार समितीत सुविधांचा अभाव
देसाईगंज : जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजरपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या देसाईगंज उपबाजार समितीत मोठ्या प्रमाणात धान्य विक्रीसाठी आणल्या जाते. मात्र या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्वतंत्र्यपूर्व काळापासूनच देसाईगंज येथे बाजारपेठ अस्तित्वात आहे. पूर्वी या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वनोपज धान्य विक्रीस आणल्या जात होते. यावरूनच या शहराला देसाईगंज असे नाव पडले. तेव्हापासून तब्बल ८० वर्षाचा कालावधी उलटूनही येथील धान्यबाजारपेठेच्या समस्या सुटल्या नाही. आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत देसाईगंज उपबाजार समिती येते. देसाईगंज बाजार समितीमध्ये कोट्यवधीची उलाढाल दरवर्षी होत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीला देसाईगंज उपबाजार समितीपासूनच सर्वाधिक उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळे देसाईगंजला स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समितीचा दर्जा देण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र अजूनपर्यंत शासनाने याला हिरवी झेंडी दर्शविलेली नाही.
बाजार समितीची मुख्य इमारत अत्यंत जीर्णावस्थेपर्यंत पोहोचली असून केव्हाही कोसळून मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाजारपेठ ८८ आर. जागेत व्यापली आहे. मात्र अजूनपर्यंत या परिसराचे काँक्रीटीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खाली ताडपत्री अंथरून धान्य ठेवावे लागते. शेतकऱ्यांना या ठिकाणी थांबण्यास किंवा थोडीफार विश्रांती करण्यास कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या व त्यांच्या सोयीसाठी एखादी कॅन्टीन उघडने आवश्यक होते. मात्र याकडे उपबाजार समितीच्या प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. महत्वाचे म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या महिला व पुरूषांसाठी मुत्रीघर व शौचालयाचीही व्यवस्था नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शौचासाठी बाहेर जावे लागते.
बाजारपेठेत दरदिवशी शेकडो वाहने धान्य घेऊन बाजार समितीत येतात. सदर वाहने पार्कींग करण्यासाठी सुद्धा जागा नाही. अनेक वाहने धानाच्या ढिगावरूनच आवागमन करतात. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. (तालुका प्रतिनिधी)