५९ खासगी शाळांना किचनशेड अनुदान मंजूर
By Admin | Updated: October 27, 2014 22:34 IST2014-10-27T22:34:48+5:302014-10-27T22:34:48+5:30
राज्यातील खासगी व इतर शाळांमध्ये शिजविल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारासाठी जागेची अडचण होती. यामुळे अनेक शाळा अडगळीच्या ठिकाणी आहार शिजविला जात होता. अन्नातून विषबाधेचे

५९ खासगी शाळांना किचनशेड अनुदान मंजूर
प्रशासकीय मान्यता मिळाली : शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी
दिलीप दहेलकर - गडचिरोली
राज्यातील खासगी व इतर शाळांमध्ये शिजविल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारासाठी जागेची अडचण होती. यामुळे अनेक शाळा अडगळीच्या ठिकाणी आहार शिजविला जात होता. अन्नातून विषबाधेचे प्रकारही वाढीस लागले होते. यावर उपाययोजना म्हणून राज्याच्या शालेय शिक्षण संचलनालयाने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरातील खासगी अनुदानित शाळांना किचनशेडसाठी अनुदान मंजूर केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात २०१४-१५ या वर्षात ५९ खासगी शाळांना किचनशेडसाठी अनुदान मंजूर केले आहे.
आहार शिजविण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये स्वतंत्र खोलीची व्यवस्था नाही. यामुळे आहाराची स्वच्छता व अशा आहारातून होणारी विषबाधा, हा प्रश्न ऐरणीवर आला होता. दुर्गम भागातील शाळांची स्थिती तर त्यापेक्षाही विधारक असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर संचालक शालेय शिक्षण संचालनालय पुणे यांच्या पत्रानुसार गडचिरोली जिल्ह्यातील ५९ अनुदानित खासगी शाळांमध्ये पोषण आहार शिवजविण्यासाठी स्वतंत्र खोलीच्या बांधकाम अनुदानास मान्यता मिळाली आहे. बांधकामासाठी २५ टक्के रक्कम शाळा संस्थेने तर ७५ टक्के रक्कम शासन अनुदानातून ३ टप्प्यात अदा करण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात १६ खासगी अनुदानित शाळांमध्ये अ दर्जाचे तर बी दर्जाचे १८ किचनशेड बांधण्या येणार आहेत. सी दर्जाचे २५ असे एकुण ५९ किचनशेड बांधकामास मंजूरी मिळाली आहे. अ दर्जाच्या किचनशेड बांधकामासाठी १ लाख २० हजार , बी दर्जाच्या किचनशेड बांधकामासाठी १ लाख ६० हजार तसेच सी दर्जाच्या किचनशेड बांधकामासाठी २ लाख २० हजार रूपयांच्या बांधकामाला मंजूरी देण्यात आली आहे.
शाळांतील २०० विद्यार्थी संख्येकरिता ए दर्जाचे तर ५०० विद्यार्थी संख्येकरिता बी दर्जाचे आणि ५०० पेक्षा अधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांत सी दर्जाचे किचनशेड बांधकाम करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या १० माध्यमिक शाळांमध्ये यापूर्वीच शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी किचनशेडचे बांधकाम करण्यात आले आहे. याशिवाय मानव विकास मिशन व सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये किचनशेड बांधकाम करण्यात आले आहे.
खासगी शाळांतील किचनशेड बांधकामाबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या संचालनालयास सादर करण्यात आले होते. त्यानंतर संचालनालय कार्यालयाने मंजुरी प्रदान केल्यानंतर आॅगस्ट महिन्यात जिल्हास्तरावर किचनशेड बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
सध्यास्थितीत खासगी व्यवस्थापनांच्या जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था नाही. त्यामुळे अनेक शाळांमध्ये परिसरात मोकळ्या जागेवर आहार शिजविला जातो. तसेच आहार शिजविण्याच्या ठिकाणी अस्वच्छता असते. त्यामुळे अशा ठिकाणी शिजविलेल्या शालेय पोषण आहारातून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच खासगी शाळांमध्ये किचनशेडची व्यवस्था होणे आवश्यक आहे. याकरिता खासगी शाळा व्यवस्थापनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनातून स्वतंत्र किचनशेड निर्मिती व्हावी.