दोन लाखांवर पोहोचले खरीप क्षेत्र
By Admin | Updated: September 7, 2016 02:15 IST2016-09-07T02:15:56+5:302016-09-07T02:15:56+5:30
मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा २०१६-१७ च्या खरीप हंगामात लागवड क्षेत्रात प्रचंड वाढ झाली असून यंदा

दोन लाखांवर पोहोचले खरीप क्षेत्र
पाच वर्षांत लक्षणीय वाढ : १ लाख ८० हजार हेक्टरवर धानाची लागवड; वनपट्टे मिळाल्याचा परिणाम
गडचिरोली : मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा २०१६-१७ च्या खरीप हंगामात लागवड क्षेत्रात प्रचंड वाढ झाली असून यंदा जवळजवळ ११४ टक्के क्षेत्रावर लागवड झाल्याचा अहवाल कृषी विभागाने राज्य शासनाला पाठविला आहे. गडचिरोली जिल्ह्यात २००८ पासून मोठ्या प्रमाणावर वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. या वनपट्ट्यावर आता शेती करण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामाचे क्षेत्र वाढले असल्याचे दिसून येत आहे.
२०१३-१४ मध्ये खरीप हंगामात १ लाख ९३ हजार २२४ हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात आली होती. यापैकी १ लाख ७० हजार ६२६ हेक्टर क्षेत्रावर केवळ धानपीक लागवड करण्यात आले होते. २०१४-१५ मध्ये १ लाख ९९ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड झाली होती. त्यांमध्ये १ लाख ७५ हजार ६८० हेक्टर क्षेत्रावर धानाचे पीक घेण्यात आले होते. २०१५-१६ मध्ये १ लाख ८६ हजार ४४७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक घेण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ७६ हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड करण्यात आली होती. तर यंदा २०१६-१७ मध्ये ३० आॅगस्टपर्यंत २ लाख १ हजार १५८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी १ लाख ७९ हजार ७०५ हेक्टर क्षेत्रावर केवळ धानाची लागवड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षात पीक पॅटर्नमध्ये बदल झाला असून खरीप हंगामात भात, मका, तृणधान्य, तूर, मूग, उडीद, भूईमूग, सूर्यफूल, तीळ, सोयाबिन, कापूस, ऊस आदी पिकांची लागवड शेतकरी करू लागले आहे. सिंचनाची सुविधा नसतानाही गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या भरवशावर शेती करताना शेतकरी लागवडीचे क्षेत्र वाढविण्याच्या मागे आहे.
या मागे प्रमुख कारण म्हणजे, २००८ मध्ये जंगलावर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना वनजमिनीचा पट्टा देऊन त्यांना भूमीस्वामी करण्यात आले. त्यामुळे हे लोक आता या पट्ट्यावर शेती करू लागले आहेत. तसेच मागील पाच वर्षांत शासनाकडून राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांमार्फत पीक कर्जाचे मोठ्या प्रमाणावर वितरण खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांना केले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात यांत्रिकी शेतीवरही मागील तीन-चार वर्षात शासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागात यांत्रिकी शेतीच्या माध्यमातून पिकांची लागवड केली जात आहे. या सर्व कारणांमुळे यावर्षी पहिल्यांदा गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामाचे लागवड क्षेत्र दोन लाखांच्या वर पोहोचले आहे. खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या अनेक शेतमालाची बाजारपेठ गडचिरोलीत उपलब्ध नसतानाही शेतकरी असे पीक घेऊन हा माल इतर प्रांतात व राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये विक्रीसाठी पाठवित आहे, हे विशेष. (नगर प्रतिनिधी)