काेराेनामुळे उर्सच्या आनंदावर विरजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:41 IST2021-08-25T04:41:32+5:302021-08-25T04:41:32+5:30
सिराेंचा : येथील प्राणहिता नदीच्या तीरावर असलेला शाहावली हैदरबाबा यांचा दर्गा सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ओळख आहे. या ठिकाणी दरवर्षी ...

काेराेनामुळे उर्सच्या आनंदावर विरजण
सिराेंचा : येथील प्राणहिता नदीच्या तीरावर असलेला शाहावली हैदरबाबा यांचा दर्गा सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ओळख आहे. या ठिकाणी दरवर्षी रजाबच्या १६ ला संदल व १७ ला उर्सचे (मार्च) आयाेजन केले जाते. तेलंगणा, छत्तीसगड राज्य व सिराेंचा तालुक्यातील हजाराे भाविक उर्ससाठी सिराेंचा येथे दाखल हाेत हाेते. मात्र, मागील वर्षीपासून काेराेनामुळे उर्स रद्द करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आनंदरावर विरजन पडले आहे.
सिराेंचा येथे शाहावली हैदरबाबांचा दर्गा आहे. त्यांचा जन्म तेलंगणा राज्यातील आसिफाबाद तालुक्यातील तांडूर या गावी झाला. लहानपणापासूनच ते आध्यात्मिक वृत्तीचे हाेते. नमाज पडण्यासाठी पवित्र जागेचा शाेध घेत असताना १६९८ ला सिराेंचापर्यंत पाेहाेचले. सिराेंचा येथील प्राणहिता नदीकाठची जागा त्यांच्या मनाला भावली. त्यांनी प्राणहिता नदीजवळ असलेल्या विठ्ठलेश्वर मंदिराजवळ नमाज पठण करण्यास सुरुवात केली. या ठिकाणी किल्ला व दर्गाचे काम करण्यात आले. बाबांच्या निगरानीखाली दर्गा तयार झाला. त्यानंतर बाबांनी स्वत:च्या आकाराचे संदुक तयार केले. दर्ग्याची पूजाअर्चा, साफसफाई व धार्मिक कार्य पार पाडण्याची जबाबदारी माे. काशिम यांच्याकडे साेपवून बाबांनी दर्ग्यात चिर विश्रांती घेतली. माे. काशिम यांच्यानंतर ही जबाबदारी त्यांच्या मुलांवर आली. पिढ्यानपिढ्या ते जबाबदारी सांभाळत आहेत.
हजरतबाबा वली हैदरशाहा यांच्या वार्षिक उर्सचे आयाेजन उर्स कमिटीतर्फे केले जाते. पहिल्या दिवशी सायंकाळी ७ वाजता बल्हारशाहा येथील संदल शरीफची सुरुवात दर्ग्यापासून केली जाते. त्यानंतर सिराेंचा शहरातील मुख्य मार्गाने फिरत जाऊन शेवटी दर्ग्यामध्येच पाेहाेचते. रात्रीच्या सुमारास कव्वाली राहते. दुसऱ्या दिवशी उर्स आयाेजित केला जाताे. उर्समध्ये खेळण्यांची दुकाने, मिठाईची दुकाने, साैंदर्य प्रसाधने, विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री हाेते. या उर्सच्या माध्यमातून सिराेंचात सर्वधर्मसमभाव दिसून येतो.
बाॅक्स ....
इंग्रजांनी पाडला किल्ला
शाहावली हैदरबाबा यांनी बांधलेला किल्ला इंग्रज राजवटीत पाडण्यात आला. जाे कुणी किल्ला पाडण्यास मदत करेल, त्याला किल्ल्याचे दगड नेण्यास मुभा दिली जाईल, असे फर्मान इंग्रज अधिकाऱ्यांनी काढले. त्यानंतर किल्ला पाडण्यात आला. या दगडांचा वापर तुरूंग व इतर इमारतींच्या बांधकामासाठी करण्यात आला. शाहावली हैदरबाबा हे घाेड्याने सिराेंचा येथे आले. सिराेंचा येथेच हा घाेडा मरण पावला. त्याचीही समाधी या ठिकाणी आहे.
बाॅक्स ..
ध्वजाच्या तुकड्यांचे विशेष महत्त्व
उर्सदरम्यान पहाटे चार वाजता जुना काळा ध्वज उतरवून नवीन काळा ध्वज चढविला जातो. यावेळी जुन्या काळ्या ध्वजाचे तुकडे केले जातात. हे तुकडे भाविकांना दिले जातात. भाविक हे तुकडे छाेट्या पेटीत ठेवतात किंवा कंबर किंवा भुजेला बांधतात. ध्वजाचा तुकडा बांधल्यामुळे बाबांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त हाेताे. संकटांवर मात करण्याची शक्ती प्राप्त हाेते, अशी मान्यता आहे. ध्वजाची दाेरी हिंदू व्यक्ती ताटीकाेंडावार यांच्याकडे सुरक्षित ठेवली जाते. ध्वजाराेहणानंतर सर्व दानपेट्या उघडतात. या दानपेटीत एक ते दीड लाख रुपयांची रक्कम जमा होते. ही उर्सच्या खर्चासाठी वापरली जाते.