बोदली परिसरातील जंगलाला आग
By Admin | Updated: March 20, 2016 02:13 IST2016-03-20T02:13:37+5:302016-03-20T02:13:37+5:30
गडचिरोली-धानोरा मुख्य मार्गालगत बोदलीजवळ दुपारी १ वाजताच्या सुमारास अज्ञात इसमाने आग लावली.

बोदली परिसरातील जंगलाला आग
वन विभागाचे दुर्लक्ष : लाखोंची वनसंपदा जळून खाक
गडचिरोली : गडचिरोली-धानोरा मुख्य मार्गालगत बोदलीजवळ दुपारी १ वाजताच्या सुमारास अज्ञात इसमाने आग लावली. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने कित्येक हेक्टर जमिनीवर वणवा पसरला. यामध्ये लाखोंची वनसंपदा जळून खाक झाली आहे.
मोह पडण्याच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. मोह वेचणे सुलभ व्हावे, यासाठी अज्ञात नागरिकाने मोहफुलाच्या झाडाखाली आग लावली व तो पसार झाला. त्यानंतर आगीने जंगल व्यापत कित्येक हेक्टरवरचे जंगल जळून खाक केले. विशेष म्हणजे, ही आग गडचिरोली-धानोरा मार्गालगत गडचिरोलीपासून तीन ते चार किमी अंतरावर घडली. आग लागूनही ती विझविण्यासाठी वन विभागाचा कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचला नसल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. यावर्षी मार्च महिन्यापासूनच कडक उन पडायला लागले आहे. त्यामुळे जंगलातील गवत अत्यंत कडक झाले आहे. अवकाळी पावसानंतर वणव्यामध्ये घट होईल, अशी अपेक्षा होती. मात्र वणवे लागण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. यावर्षी उन्हाळभरात सर्वाधिक वणवे लागल्याच्या घटनांची नोंद वन विभागाकडे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वन विभागाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)