क्षणार्धात उडी घेतली अन् ‘ते’ दाेघेही बचावले; मोटरसायकलचा झाला चेंदामेंदा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 21:24 IST2023-05-23T21:23:41+5:302023-05-23T21:24:04+5:30
Gadchiroli News अवजड ट्रक घाटावर चढत असताना अचानक मागे येऊ लागला. याचवेळी त्याच्या मागे दाेघेजण एका दुचाकीवर हाेते; परंतु दाेघांनीही सतर्कता व समयसूचकता बाळगून वेळीच दुचाकीवरून बाजूला उडी घेतली व ते थाेडक्यात बचावले.

क्षणार्धात उडी घेतली अन् ‘ते’ दाेघेही बचावले; मोटरसायकलचा झाला चेंदामेंदा...
गडचिराेली : अवजड ट्रक घाटावर चढत असताना अचानक मागे येऊ लागला. याचवेळी त्याच्या मागे दाेघेजण एका दुचाकीवर हाेते; परंतु दाेघांनीही सतर्कता व समयसूचकता बाळगून वेळीच दुचाकीवरून बाजूला उडी घेतली व ते थाेडक्यात बचावले. मात्र, त्यांची दुचाकी ट्रकच्या दाेन चाकांच्या मधाेमध सापडून चेंदामेंदा झाला. ही घटना काेरची तालुक्याच्या पुराडा-बेळगाव घाटावर मंगळवार २३ मे राेजी घडली.
काेरची येथील पारबताबाई विद्यालयाचे लिपिक श्यामराव उंदीरवाडे आणि याच शाळेतील सहायक शिक्षक जीवन भैसारे हे मोटारसायकलने गडचिरोली येथे पगार बिल सादर करण्यासाठी मंगळवारी सकाळी काेरचीहून निघाले.
बेळगावपासून ७ किमी अंतरावर असलेल्या घाटातील चढावर एक ट्रक वर चढत होते. याचवेळी विरुद्ध दिशेने एक ट्रक खाली येत होते. उंदीरवाडे व शिवणकर यांची मोटार सायकल वर चढणाऱ्या ट्रकच्या मागे होती; परंतु वर चढणारा ट्रक अचानक रिव्हर्स येऊ लागला. हे ओळखून क्षणाचाही विलंब न करता मोटार सायकलस्वार जीवन भैसारे आणि श्यामराव उंदीरवाडे यांनी मोटारसायकलवरून उडी घेतली. त्यामुळे काेणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु माेटारसायकलचा चेंदामेंदा झाला.
आंतरराज्यीय अवजड वाहतूक धाेकादायक
बेळगाव ते पुराडा या २० किमी अंतरादरम्यान डोंगर, दऱ्या, घनदाट जंगल आहे. तसेच हा रस्ता नागमाेडी वळणाचा आहे. या मार्गाने राज्यातील अवजड वाहनांची छत्तीसगड राज्यात २४ तास वर्दळ असते. वाहनांच्या वर्दळीच्या प्रमाणात हा रस्ता याेग्य नाही. हा मार्ग एकेरी व अरुंद असल्याने या मार्गावर नेहमीच अपघात होतात. सदर मार्गाचे रुंदीकरण व नूतनीकरण करणे गरजेचे आहे.अन्यथा आंतरराज्यीय अवजड वाहतूक लाेकांचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही.