न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
By गेापाल लाजुरकर | Updated: May 25, 2025 21:44 IST2025-05-25T21:43:30+5:302025-05-25T21:44:48+5:30
दूषित पाणी प्यायल्याने त्यांची प्रकृती बिघडली. बाेअरमध्ये साप मेले असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी दिवसभरासाठी निवासस्थान साेडले.

न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
अहेरी (गडचिराेली) : सरन्यायाधिशांच्या प्राेटाेकाॅलबाबतचा मुद्दा देशभर गाजत असतानाच अहेरी तालुका मुख्यालयातही न्यायाधिशांना असुविधांचा सामना करावा लागल्याचा प्रकार रविवार, २५ मे राेजी उघडकीस आला. चक्क दिवाणी न्यायाधिशांना गत चार दिवसांपासून बाेअरमध्ये साप मेलेले दूषित पाणी प्यावे लागले. दूषित पाणी प्यायल्याने त्यांची प्रकृती बिघडली. बाेअरमध्ये साप मेले असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी दिवसभरासाठी निवासस्थान साेडले.
अहेरी येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) शाहीद साजीदुजम्मा एम.एच.यांच्या अहेरी येथील शासकीय निवास्थानातील बाेअरवेल परिसरातून काहीतरी मेल्याची दुर्गंधी येत हाेती. त्यांना सुरूवातीला काही त्रास जाणवला नाही. मात्र, तीन दिवसांनंतर त्यांची प्रकृती बिघडली. ते रुग्णालयात भरती झाले. त्यानंतर रविवारी त्यांनी आलापल्ली येथील खासगी बाेअरवेल दुरूस्ती करणाऱ्या व्यक्तीमार्फत बाेअरवेलमधील सबमर्शिबल काढून पाहिले असता तेथे एक मोठा साप सडलेल्या अवस्थेत आढळला. रविवारी सायंकाळी न्यायाधिशांनी बाहेरून पाण्याची व्यवस्था केली व त्यांनी शासकीय निवासस्थानी मुक्काम केला.
मुख्याधिकाऱ्यांचा ‘नाे रिस्पाॅन्स’
न्यायाधीश शाहीद साजीदुजम्मा यांनी अहेरी नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी न्यायाधिशांना प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांनी आलापल्ली येथील एका खासगी व्यक्तीला बाेलावून मर्शिबलमधून साप बाहेर काढायला लावले. न्यायाधिशांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसेल, प्रशासनाकडून त्यांना प्रतिसाद मिळत नसेल तर सर्वसामान्यांच्या बाबतीत काय घडत असेल, याची कल्पना न केलेलीच बरी, अशी खंत न्यायाधीश शाहीद साजीदुजम्मा यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.