झोपा काढा आंदोलन! सरकारी शाळांच्या दुरवस्थेवर आम आदमी पक्षाचं अनोखं आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 18:54 IST2025-08-22T18:53:33+5:302025-08-22T18:54:45+5:30
७२ शाळा बंद होणार? : कंत्राटी शिक्षकांचे मानधन थकीत, विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

'Jhopa Kadha Andolan'! Aam Aadmi Party's unique movement on the plight of government schools
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील सरकारी शाळांच्या दुरवस्थेविरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर "झोपा काढा" आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी जि.प. च्या समोर प्रतीकात्मक झोप घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले.
जिल्ह्यातील जीर्ण आणि धोकादायक शाळा इमारती तसेच शिक्षकांच्या रिक्त पदांच्या प्रश्नांबाबत प्रशासन उदासीन असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. कंत्राटी शिक्षकांचे मानधन थकीत असून, अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि कमी पटसंख्येच्या नावाखाली ७२ शाळा बंद करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात यांची होती उपस्थिती
आंदोलनात जिल्हाध्यक्ष नासीर हाशमी, जिल्हा उपाध्यक्ष राजू माधवी, जिल्हा संघटक ताहीर शेख, जिल्हा सचिव अमृत मेहेर, संघटन मंत्री चेतन गहाणे, नागेश तोरेम, सिराज पठाण, अतुल सिंदराम, आशिष घुटके, फारूक पटेल, रामदास गोंडाणे, संघटक वामन पगाडे, इरफान पठाण, शत्रुघ्न नन्नावरे, साहिल बोदेले, संतोष कोडापे, राहील खतीब, प्रेम बहेटवार आदी उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांना प्रवेशद्वारावरच रोखले
जिल्हाध्यक्ष नासीर हाशमी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जि.प. समोर घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांना प्रवेशद्वारावरच अडविले. आंदोलकांनी तेथेच प्रतीकात्मक झोप घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिक्षणाधिकारी (प्रा.) बाळासाहेब पवार यांना निवेदन सादर करून चर्चा करण्यात आली. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांच्या दुरुस्ती आणि कंत्राटी शिक्षकांचे थकीत मानधन देण्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्टीकरण दिले.