संक्रांतीदरम्यान सकारात्मक संवाद करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 23:23 IST2019-01-22T23:23:18+5:302019-01-22T23:23:41+5:30
संक्रांतीनिमित्त महिला एकत्र येतात. यामुळे संवाद घडून येतो. संवाद हा संवेदनशील, अहिंसक, शक्ती जागृत करणारा व ऊर्जा देणारा असावा. आपल्यामध्ये एखादी व्यक्ती नाही, म्हणून तिची चुगली करणे, अशा प्रकारचा नकारात्मक संवाद न करता सकारात्मक संवाद करावा.

संक्रांतीदरम्यान सकारात्मक संवाद करावा
संक्रांतीनिमित्त महिला एकत्र येतात. यामुळे संवाद घडून येतो. संवाद हा संवेदनशील, अहिंसक, शक्ती जागृत करणारा व ऊर्जा देणारा असावा. आपल्यामध्ये एखादी व्यक्ती नाही, म्हणून तिची चुगली करणे, अशा प्रकारचा नकारात्मक संवाद न करता सकारात्मक संवाद करावा. संवाद हे जगातील सर्वात महत्त्वाचे चलन आहे. पैशाने व्यवहार होतो. मात्र संवादाने तो घडून येतो. संक्रांतीच्या निमित्ताने महिलांना व्यक्त होता येते, नाती जपण्याचे कौशल्य प्राप्त होते. भावनांना मोकळी वाट करून देता येत असल्याने मन स्वच्छ व निर्मळ राहण्यास मदत होते. संवादाने संवेदनशील मनांचे मिलन होते. महिलांमध्ये ऊर्जा, प्रेम, सहनशिलता, सृजनशिलता अशा अनेक गोष्टी दडल्या आहेत. या सर्व गोष्टींचा उपयोग विधायक कामांसाठी होऊ शकतो. स्त्रीमध्ये मातृत्व व दातृत्व राहते. वाणाच्या निमित्ताने दातृत्वाची भावना प्रकर्षाने जागृत होते. प्रत्येकाने प्रेमाने बोलले पाहिजे. समाजात क्रांती, बदल संवादाच्या माध्यमातून होऊ शकते. प्रेम हे जगण्याचे तत्व आहे. प्रेमळ संवादाचा कुटुंब व समाजाला फायदा होतो. मनातील गैरसमज, राग, द्वेष आणि त्यातून उद्भवणारा वाद टाळायचा असेल तर संवाद गरजेचा आहे. संवादाने माणूस खुलतो, फुलतो आणि आनंदी होतो. यामुळे संपूर्ण जग आनंदी राहते, एवढी ताकद संवादामध्ये आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. संवादाच्या माध्यमातून विचारांचे संघटन होते. जिच्याकडे पण..‘ती’ म्हणून पाहिले जाते, संवादाच्या माध्यमातून ती काळोख दूर करणारी पणती निर्माण होऊ शकते.
सविता सादमवार
मुख्याध्यापिका, प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट तथा जिल्हा बाल कल्याण समिती अध्यक्ष, संचालिका, पणती संस्था