जिल्ह्यात उद्योगांना भरारी देण्यासाठी १७ हजार कोटींची गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 16:01 IST2025-04-12T15:47:14+5:302025-04-12T16:01:50+5:30
१२ कंपन्यांसोबत सामंजस्य करार : गुंतवणूक परिषद; रोजगाराच्या संधी

Investment of Rs. 17 thousand crores to boost industries in the district
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा एक भाग असलेल्या 'औद्योगिक गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्मिती' अंतर्गत जिल्ह्यात उद्योगांना भरारी देण्यासाठी १२ कंपन्यांसोबत जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी (दि. ११) सामंजस्य करार केले. यामध्ये विविध कंपन्यांनी १७ हजार ४३१ कोटींची गुंतवणूक करण्यास तयारी दर्शविली. यातून थेट १४४ हजार १०० व्यक्तींना रोजगार उपलब्ध होणार, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. जिल्हा नियोजन भवनात जिल्हा प्रशासन व जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट-२०२५ मध्ये हे सामंजस्य करार करण्यात आले.
मंचावर आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उद्योग विभागाचे सहसंचालक गजेंद्र भारती, मैत्री संस्थेचे नोडल अधिकारी पद्माकर हजारे, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक अशोक खडसे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सूर्य, विनोद ठोंबरे आदी उपस्थित होते. आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सामंजस्य करार झालेल्या १२ उद्योगांपैकी ७ स्टील उद्योग आहेत. राज्यातील एकूण खनिज संपत्तीपैकी नागपूर विभागात ६० टक्के खनिज आहे. एकूण खनिजांपैकी ७५ टक्के खनिज संपत्ती चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आहे. विविध क्षेत्रातील उद्योग चंद्रपुरात यावे, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे. आमदार किशोर जोरगेवार यांनीही उद्योगांसाठी जिल्ह्यात पूरक स्थिती असल्याचे यावेळी सांगितले.
नागपूर विभागात सर्वाधिक गुंतवणूक जिल्ह्यात
करारात १२ कंपन्यांपैकी सात उद्योग स्टील क्षेत्राशी संबंधित आहे. मायनिंग, बायोफ्यूएल, रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग व केमिकल टेस्टिंग क्षेत्राशी संबंधित प्रत्येकी एक उद्योग आहे. शासनाने नागपूर विभागाला १४ हजार कोटींचे लक्ष्य दिले. एकट्या चंद्रपूरने १७ हजार ४३१ कोटी गुंतवणुकीची तयारी केली.
संभाव्य गुंतवणूक कोटी रोजगार
दीनानाथ अलॉएड स्टील ५०० ७००
डब्ल्यूसीएल भटाडी ७२९ ४२५
जी. आर. क्रिष्ण फेरो अलॉय ७५० १०००
भाग्यलक्ष्मी स्पॉज १०५३ ७५०
चमन मेटॅलिक ४५० ६५०
गोवा स्पाँज अॅन्ड पॉवर २००० १५००
कार्निव्हल इंडस्ट्रीज ३२० ५५०
पाटील रेल इन्फ्रास्ट्रक्चर १०० २५०
ग्रेटा एनर्जी १०३१९ ७०००
डीएनडी एन्टरप्रायजेस १०० २५०
कालिका स्टील अॅन्ड पॉवर ११०० १०००
जेपी असोसिएट्स लेबॉरटरीज १० २५
जिल्हास्तरीय गुंतवणूक समिती
सामंजस्य कराराची केवळ सुरुवात आहे. उद्योजकांना जिल्हा प्रशासन पूर्ण सहकार्य करेल. जिल्ह्यात इन्व्हेस्टमेंट प्रमोशन कमिटी स्थापन झाली. त्याद्वारे अडचणी सोडविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिली. प्रास्ताविक सहसंचालक गजेंद्र भारती तर श्याम हेडाऊ यांनी संचालन केले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सूर्य यांनी आभार मानले.