चारचाकी लावण्यासाठी अपुरी जागा, दुकानांसमाेरील पार्किंगमुळे अपघातास निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:08 IST2021-02-18T05:08:21+5:302021-02-18T05:08:21+5:30
गडचिराेली : व्यावसायिक कामासाठी बांधण्यात येत असलेल्या इमारतीसमाेर वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. मात्र, गडचिराेली शहरातील अनेक ...

चारचाकी लावण्यासाठी अपुरी जागा, दुकानांसमाेरील पार्किंगमुळे अपघातास निमंत्रण
गडचिराेली : व्यावसायिक कामासाठी बांधण्यात येत असलेल्या इमारतीसमाेर वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. मात्र, गडचिराेली शहरातील अनेक इमारतींसमाेर पुरेशी जागा नाही. त्यामुळे चारचाकी व दुचाकी वाहने रस्त्यावर ठेवली जातात. परिणामी, वाहतुकीची काेंडी हाेण्याबराेबरच अपघाताचीही शक्यता अधिक राहते.
गडचिराेली शहरातील इंदिरा गांधी चाैकापासून चारही मार्गांवर सध्या अस्तित्वात असलेल्या दुकानांच्या इमारती राहण्याच्या घरासाठी बांधण्यात आल्या हाेत्या. जिल्हास्थळ झाल्यानंतर बाजारपेठ वाढून रस्त्याच्या बाजूला असलेल्या इमारतींना महत्त्व आल्याने काही नागरिकांनी राहती घरे दुकानांसाठी भाड्याने दिली आहेत. या घरांसमाेर पार्किंगसाठी पुरेशी जागा साेडण्यात आली नाही. त्यामुळे वाहने रस्त्यावरच उभी ठेवावी लागतात. काही घरे तर अगदी रस्त्याला खेटून बांधण्यात आली आहेत.
नवीन दुकाने बांधतेवेळीसुद्धा इमारत मालक नगर परिषदेची दिशाभूल करतात. तळमजला पार्किंगसाठी ठेवण्यात येईल, असे नकाशात दाखविले जाते. काही दिवसानंतर तळमजल्यावरसुद्धा दुकाने बांधली जात आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहने उभी ठेवण्याशिवाय पर्याय नाही. चारही मुख्य मार्गांवर रस्त्याच्या बाजूला ग्राहक वाहने उभी ठेवून वस्तू खरेदी करीत असल्याचे दिसून येते.
बाॅक्स...
अंगण नसल्याने कार रस्त्यावर
बदलत्या जीवनशैलीनुसार अनेकांनी कार खरेदी केली आहे. मात्र, कार ठेवण्यासाठी घरी जागा नाही. त्यामुळे घराच्या बाजूला रस्त्यावर कार उभी ठेवली जाते. काही वस्त्यांमध्ये रस्त्यांची रुंदी १५ ते २० फुटांदरम्यान आहे. रस्त्यावर कार ठेवल्यानंतर दुसरे वाहन जात नाही.
बाॅक्स...
मुख्य बाजारपेठेत गंभीर समस्या
गडचिराेली शहरातील मुख्य बाजारपेठेमधील राेड केवळ २५ फूट अंतराचा आहे. दाेन्ही बाजूंना कापड, चप्पल, मेडिकल, स्टेशनरी व विविध प्रकारची दुकाने आहेत. यातील एकाही दुकानाला पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे दुकानासमाेरच रस्त्यावर वाहने उभी ठेवली जातात. दिवसभर याठिकाणी वाहतुकीची काेंडी हाेते. अशाही स्थितीत एखादा कारचालक बाजारपेठेच्या रस्त्यावरून वाहन नेते त्यावेळी वाहतूक काेंडीची समस्या गंभीर बनते.