अहेरीत ट्रॅक्टरधारकांचे बेमुदत उपोषण सुरू
By Admin | Updated: August 6, 2015 02:16 IST2015-08-06T02:16:33+5:302015-08-06T02:16:33+5:30
अमानवीय गौण खनिज कायद्यामध्ये शिथिलता आणावी, जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना विविध खनिज वाहतूक व उत्खननाचे परवाने देऊन उपासमारी थांबवावी,

अहेरीत ट्रॅक्टरधारकांचे बेमुदत उपोषण सुरू
पाचही तालुक्यातील ट्रॅक्टरधारक सहभागी : रेती उत्खनन व वाहतुकीच्या जाचक अटी रद्द करा
अहेरी : अमानवीय गौण खनिज कायद्यामध्ये शिथिलता आणावी, जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना विविध खनिज वाहतूक व उत्खननाचे परवाने देऊन उपासमारी थांबवावी, या मागणीला घेऊन अहेरी तालुका ट्रॅक्टर मालक, चालक संघटनेच्या वतीने बुधवारपासून अहेरीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या उपोषणात अहेरी उपविभागातील अहेरी, मुलचेरा, भामरागड, सिरोंचा व एटापल्ली आदी पाच तालुक्यांतील ट्रॅक्टर मालक, चालक व ट्रॅक्टर मजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. बेमूदत उपोषणापूर्वी दहा ते बारा दिवसांपासून अहेरी व एटापल्ली येथील ट्रॅक्टरचालक गावात मोकळ्या जागेत सर्व ट्रॅक्टर व ट्रॉली उभ्या करून कामबंद आंदोलन पुकारले होते. यासंदर्भात प्रशासन व शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. अखेर ट्रॅक्टर मालक, चालक संघटनेने अहेरीच्या उपविभागीय कार्यालयासमोर बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
उपोषणादरम्यान ट्रॅक्टर मालक, चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अहेरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, ट्रॅक्टर विकत घेऊन गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांची संख्या अहेरी उपविभागात ५०० हून अधिक आहे. ट्रॅक्टर वाहतुकीच्या भरवशावर ट्रॅक्टर मालकाच्या ५०० कुटुंबासह ट्रॅक्टरवरील जवळपास पाच हजार मजूर कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. तसेच कंत्राटदार, मिस्त्री, मजूर आदींना रोजगार प्राप्त होतो. मात्र शासनाने नव्याने लादलेल्या जाचक अटीमुळे बांधकामांशी संबंधित सर्व घटकांवर उपासमारीची पाळी आली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
या उपोषणात ट्रॅक्टर मालक, चालक संघटना अहेरीचे अध्यक्ष रवी नेलकुद्री, उमेश गुप्ता, कपील गुंडावार, गणेश चल्लावार, आबिद शेख, इरफान शेख, राकेश वर्दलवार, प्रभाकर डोंगरे, संजय झोडे, संजय अलोणे आदी सहभागी झाले आहेत.